नगर – पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रमेश चिमाजी जाधव (वय 50, रा. शिरापूर शिवार, ता. पाथर्डी, जि. नगर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी रमेश जाधव व त्याची मयत पत्नी हिराबाई हे शिरापूर येथे राहात होते. त्यांना दोन मुले व तीन मुली असून, मुलींचे लग्न झाले आहे. आरोपी रमेश हा मयत हिराबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

दि. 22 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 9 नंतर आरोपी रमेश जाधव याने पत्नी हिराबाई हिस चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. सकाळी तिचे प्रेत घरासमोर मोकळ्या जागेत पुरून टाकले. हिराबाई हिचा खून करून तिला पुरले आहे, अशी माहिती सरपंच बुधवंत यांनी पाथर्डी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रमेश याला अटक केली होती. याबाबत हिराबाई यांचे भाऊ संतोष वाघ याने फिर्याद दिली होती.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पावसे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही घटना परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होती. सरकारी पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी संतोष वाघ, मुलगा अंकुश जाधव, वैद्यकीय अधिकारी नीलेश गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी रमेश चिमाजी जाधव यास जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादीच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले.