
नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त 16 जागांवर महासभेद्वारे सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे 6, शिवसेना 5, भाजप 4, काँग्रेस व बसपा प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. दि. 23 ऑगस्टला झालेल्या महाभेत समितीचे विसर्जन करण्यात आले. या समितीत नव्या 16 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बुधवारी ऑनलाइन महासभा झाली. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगर सचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते. पक्षीय कोटय़ानुसार राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस व बसप या पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
या पक्षाच्या गटनेत्यांनी बंद पाकिटातून समिती सदस्यासाठी नावांची शिफारस महापौरांकडे केली. महापौर शेंडगे यांनी सदर नावांवर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, मनपात महाविकास आघाडी सत्तेत आहे. महापौरपद शिवसेनेकडे, उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. याशिवाय स्थायी समिती सभापतिपदही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बसपाच्या पत्रासाठी प्रतीक्षा
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व काँगेसच्या सदस्यांची महासभेत नियुक्ती करण्यात आली. मात्र, तोपर्यंत बसपाच्या सदस्याच्या नियुक्तीसाठी गटनेत्यांचे शिफारसपत्र आले नव्हते. यासाठी काही वेळ प्रतीक्षा करण्याची वेळ महासभेवर आली. गटनेते मुदस्सर शेख यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर काही वेळात बसपचे शिफारसपत्र महासभेला प्राप्त झाले आणि बसपाच्या अनिता पंजाबी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
या सदस्यांची नियुक्ती
राष्ट्रवादी – मीना चोपडा, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, परवीन कुरेशी, शोभा बोरकर.
शिवसेना – कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुरेखा कदम, सुवर्णा गेनप्पा, शांताबाई शिंदे.
भाजप – वंदना ताठे, सोनाली चितळे, आशा कराळे, पल्लवी जाधव,
काँग्रेस – सुप्रिया जाधव
बसप – अनिता पंजाबी




























































