AI मुळे येत्या पाच वर्षांत अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, गुगलच्या Deepmind सीईओने दिला इशारा

AI चा शिरकाव आपल्या आयुष्यात झाल्यामुळे, आपल्या आयुष्याची गणितं बदलली आहेत. या बदललेल्या गणितांमुळे आता नोकऱ्यांवर कुऱ्हाड येणार हे सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु आता याची घोषणा स्वतः गुगलच्या डीपमाइंडच्या सीईओ कडून करण्यात आली आहे. म्हणूनच आगामी धोका लक्षात घेता, गुगल डीपमाइंडचे सीईओ डेमिस हसाबिस यांनी तरुणांना AI शिकण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ज्यांना AI समजते तेच भविष्यामध्ये टिकतील.

सध्याच्या घडीला जगभरामध्ये AI चा वेगाने प्रसार होत आहे. यावरच आता गुगल डीपमाइंडचे सीईओ डेमिस हसाबिस यांचा तरुणांसाठी एक साधा सोपा संदेश दिला आहे. ते स्पष्टपणे म्हणाले आहेत की, ” AI शिका, नाहीतर मागे पडाल.” त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, येत्या पाच वर्षांत जे तरुण AI समजून घेतील आणि त्याचा स्विकार करतील तेच टिकतील.

हसाबिस हे गुगलच्या सर्वात प्रगत AI प्रकल्पांवर काम करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेचे नेतृत्व करतात. यामध्ये जेमिनी चॅटबॉट आणि AGI आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) यांचा समावेश आहे. अलिकडेच झालेल्या गुगल आय/ओ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये हसाबिस म्हणाले की, येत्या 10 वर्षांत AGI विकसित केले जाऊ शकते.

‘हार्ड फोर्क’ या टेक पॉडकास्टवर बोलताना, हसाबिस म्हणाले की, ज्याप्रमाणे इंटरनेटने मिलेनियल्सचे रूपांतर केले. इतकेच नाही तर, स्मार्टफोनने जनरेशन झेडचे रूपांतर केले. त्याचप्रमाणे जनरेटिव्ह AI हे जनरेशन अल्फाचे वैशिष्ट्य बनत आहे. त्यांनी तरुणांना आतापासूनच AI टूल्सचा सराव करण्यास सुरुवात करायला सांगितले आहे. केवळ टूल्स वापरून भागणार नाही तर, यामध्ये स्वतःला तांत्रिकदृष्ट्या प्रवीण बनवण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणाले, “नवीन तंत्रज्ञान येताच काही नोकऱ्या जातात, परंतु अधिक आव्हानात्मक नोकऱ्याही उपलब्ध होतात.

हसाबिस यांनी तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) मध्ये मजबूत पाया रचण्यास प्रोत्साहित केले. तसेच विशेषतः कोडिंगचे भविष्यातील महत्त्वाचे मार्गदर्शनही केले. त्यांनी असेही म्हटले की, सर्जनशीलता, लवचिकता आणि बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता यासारखे ‘मेटास्किल्स’ तितकेच महत्त्वाचे आहेत. २०२२ मध्ये ओपन AI ने चॅटजीपीटी लाँच केल्यापासून जगभरातील शिक्षण आणि नोकऱ्यांवर खूप मोठा परिणाम झालेला आहे.