विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या इंजिनीयरिंग कॉलेजांची मान्यता रद्द करणार!

165

सामना प्रतिनिधी, मुंबई

इंजिनीयरिंग महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांना अनेकदा जातीभेद, रॅगिंग अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्याबाबत विद्यार्थी तक्रारही करतात, पण क्वचितच अशा तक्रारींची दखल घेतली जाते. यापुढे मात्र असे खपवून घेतले जाणार नाही असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बजावले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या महाविद्यालयांची मान्यताच रद्द करण्याचा इशारा ‘एआयसीटीई’ने दिला आहे.

प्रत्येक इंजिनीयरिंग महाविद्यालयात विद्यार्थी तक्रार निवारण समिती आहे. विद्यार्थी या समितीकडे तक्रारी करू शकतात. त्यांच्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर समितीकडून कारवाईची शिफारस केली जाते परंतु महाविद्यालय प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते अशा तक्रारी एआयसीटीईकडे आल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून एआयसीटीईने कायद्याचा नवा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर विद्यार्थी, पालक आणि संबंधितांची मते एआयसीटीईने 20 ऑगस्टपर्यंत मागवली आहेत.

मसुद्यातील कारवाईच्या तरतुदी…
महाविद्यालयांचे अनुदान बंद करणार.
मान्य झालेल्या अनुदानाला स्थगिती देणे.
एआयसीटीईची मान्यता रद्द करणे.
संबंधित विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची शिफारस करणे.
एआयसीटीईच्या विशेष कार्यक्रमांतर्गत निधी न देणे.
संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्यासंदर्भात माध्यमांमध्ये जाहीर नोटीस देणे.

आपली प्रतिक्रिया द्या