संरक्षण साहित्य कधीच वेळेवर मिळत नाही, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी संरक्षण खर्चातील कपातीवर ठेवले बोट

‘ऑपरेशन सिंदूर’ या सैन्याने केलेल्या जिगरबाज कामगिरीचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले काही दिवस निवडणुकांचे राजकारण करत फिरत आहेत. प्रत्यक्षात मोदी सरकारकडून देशाच्या संरक्षणाचे साहित्य वेळेत मिळविताना सैन्याला यातायात होत आहे. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण साहित्याच्या खरेदीत होणाऱ्या कमालीच्या विलंबावर बोट ठेवले. राष्ट्राच्या संरक्षणाकरिता आखला गेलेला एकही संरक्षण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सीआयआय बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ हा एक राष्ट्रीय विजय आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे सत्याचा विजय झाला. तसेच देवही आपल्यासोबत आहे त्यामुळेच आपल्या विजय मिळाला. मी प्रत्येक हिंदुस्थानीचे आभार मानतो. मला विश्वास आहे की, प्रत्येक हिंदुस्थानीची नजर आपल्या विजयाकडे होती. अनेकदा असे सांगितले गेले की, हे अशा प्रकारचे ऑपरेशन होते की जे सर्व लोकांनी अतिशय काटेकोरपणे राबवले, सर्व यंत्रणा, सर्व सुरक्षा दले, आपण सर्वच एकत्र आलो तर सर्वकाही आपोआप होते, असे ए. पी. सिंग म्हणाले.

एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो…

‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो… मै अपने आप की भी नही सुनता…’ असा सलमान खानच्या सिनेमातील फेमस डायलॉग मारत सिंग यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला.

युद्धनीती वेगाने बदलतेय – नौदलप्रमुख

युद्धनीती अतिशय वेगाने बदलत असून असेच होत राहणार आहे, असे सीआयआय बिझनेस समिटमध्ये सहभाग घेतलेल्या नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे की आपण नेमके कुठल्या दिशेने जातोय. आपली विचार करण्याची पद्धत अधिक उत्तम करण्यासाठी आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे. सध्या आपण प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आहोत आणि पुढेही राहू, असेही त्रिपाठी म्हणाले.