
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना, विमानसेवेवरही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. असे असताना, मंगळवारी एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामध्ये एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यासाठी प्रवाशांनी विमानाच्या पायलटचे कौतुक केले. प्रवाशांनी पायलटला खरा हिरो म्हटले आहे. विमानाच्या सुरक्षित लँडिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर या पायलटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विमान धावपट्टीवर सुरळीत उतरताना दिसत आहे. एका प्रवाशाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले आहे. कमी दृश्यमानता असूनही सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल कॅप्टन नीरज सेठी यांना सलाम.
सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. पायलट-इन-कमांड कॅप्टन नीरज सेठी यांचे खूप कौतुक झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरातील रस्ते आणि सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवनावर वाईट परिणाम झाला आहे. मुंबईच्या जीवनवाहिनीवरही परीणाम झाला आहे. ३७० हून अधिक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे, त्यापैकी आठ विमाने इतर विमानतळांवर वळवावी लागली आहेत.