
मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासातील स्थिरता आणि कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी कंपनीने युरोप, अमेरिका आणि आशियातील विविध शहरांसाठी ७८ अतिरिक्त विमान फेऱ्या सुरू करण्याची घोषणा केली आहे.
इराण, इस्रायल आणि आसपासच्या देशांमधील संघर्षामुळे अनेक विमान कंपन्यांना आपले मार्ग बदलावे लागत आहेत किंवा उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. या अनिश्चिततेच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवासाचा पर्याय मिळावा, हा एअर इंडियाच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे, असे बोलले जात आहे.
कुठे आणि किती वाढणार फेऱ्या?
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या अतिरिक्त फेऱ्या प्रामुख्याने लंडन, बर्मिंगहॅम, सॅन फ्रान्सिस्को आणि दुबई सारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी असतील. यामध्ये युरोपसाठी २५, उत्तर अमेरिकेसाठी १० आणि आशियातील इतर देशांसाठी उर्वरित फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना युद्धाच्या सावटाखालीही विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे.




























































