
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय गुरुवारी भूमी चौहान यांना आला. लंडनला जाणारे विमान पकडण्यासाठी भूमी अहमदाबादच्या विमानतळावर पोचल्या, मात्र त्यांना पोचायला 10 मिनिटे उशीर झाला. त्या पोचण्याआधी विमानाने उड्डाण केले आणि त्यानंतर मिनिटभरात मोठी दुर्घटना घडली. अपघाताचे वृत्त समजताच भूमी एकदम थरथरू लागल्या. उशीर झाला आणि गणपती बाप्पा पावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मला काय बोलावे ते सुचत नाही, असे त्या म्हणाल्या.
भूमी चौहान लंडनच्या रहिवासी आहेत. सध्या सुट्टीनिमित्त त्या माहेरी अहमदाबादला आल्या होत्या. गुरुवारी त्या एअर इंडियाच्या याच विमानाने लंडनला पतीकडे परतणार होत्या. त्यांना नशिबाने फ्लाईट पकडण्यास उशीर झाला. त्यामुळे त्या बचावल्या. पतीकडे जायला मिळणार नाही म्हणून त्या नशिबाला दोष देत दुपारी 1.30 वाजता घरी निघून गेल्या आणि हेच विमान अपघातग्रस्त झाल्याचे त्यांनी ऐकले. त्यावेळी त्यांना काय बोलावे हे सुचेना. त्यांनी मनोमन गणपती बाप्पाचे आभार मानले.

























































