Air India Plane Crash – अहमदाबादमधील विमान दुर्घटनेचं कारण 20 दिवसांनंतर आलं समोर! वाचा

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताला दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. गेल्या महिन्यात 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमान अपघातात 241 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. परंतु आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, अपघाताचे कारण दोन्ही इंजिनमधील बिघाड हे आहे. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात झालेल्या अपघाताचे संभाव्य कारण देण्यात आलेले आहे. यानुसार विमानाच्या सिम्युलेटरमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकांकडून विमान अपघातादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडांचे व्यवस्थिथ निरीक्षण करण्यात आले आहे. परंतु या माहितीबाबत एअर इंडियाकडून मात्र कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. अहवालात म्हटल्यानुसार, बोईंग 787 फ्लाइट एआय 181 च्या अवशेषांच्या फोटोंवरुन फ्लॅप उघडे दिसत होते. हे फ्लॅप दुमडलेले नव्हते असे आता स्पष्ट झालेले आहे. फ्लॅप्समुळे कोणत्याही विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान वेग कमी करण्यास मदत होते.

मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक त्रुटींमुळे विमान कोसळण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. दोन्ही इंजिनामध्ये एकाच वेळी बिघाड झाल्यामुळे अपघात होऊ शकतो असे यावर विमान वाहतूक तज्ञ आणि माजी नौदलाचे पायलट कॅप्टन स्टीव्ह शिबनर म्हणाले. या विमानाने उड्डाण केल्यानंतर, लगेचच एअर टर्बाइनयाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळेच टेकऑफनंतर लगेचच दोन्ही इंजिन निकामी झाल्याची शक्यता आता निदर्शनास येत आहे.

अपघाताचे मिळालेले फुटेज तपासताना असे आढळून आले की, विमानाचा लँडिंग गियर थोडा पुढे झुकला होता. तसेच या विमानाची चाके आत आली होती. परंतु लँडिंग गियरचे दरवाजे मात्र उघडले गेले नाही. त्यामुळेच विमानात अचानक वीज जाऊन, हायड्रॉलिक बिघाड झाला असावा असे कारण आता समोर येत आहे. असे मानले जाते की, येत्या काही दिवसांमध्ये विमान अपघाताच्या अंतिम क्षणी नेमके काय घडले हे स्पष्ट होईल. सध्या, एएआयबी आणि एअर इंडियाने अपघातावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही, परंतु सूत्रांच्या मते, अपघाताचे कारण आता तांत्रिक बिघाडावर केंद्रित आहे.