चार मराठी कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर; दोन क्रू मेंबरसह को-पायलट, एअर हॉस्टेसचा मृत्यू

अहमदाबाद येथील विमानदुर्घटनेत 242 प्रवाशांमध्ये ठाणे, रायगडमधील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन क्रू मेंबरसह, को पायलट आणि एअर हॉस्टेसचा मृत्यू झाल्याने चार मराठी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यात अपर्णा महाडिक यांचाही समावेश आहे अपर्णा या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या भाचेसून आहेत.

तटकरेंच्या भाचेसुनेचा मृत्यू

सुनील तटकरे यांच्या मोठय़ा बहिणीची सून अपर्णा महाडिक या एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या. अपर्णा यांचे पती  एअर इंडियामध्येच आहे. आज दुपारची फ्लाईट असल्याने अपर्णा सकाळी अहमदाबादला गेल्या होत्या.

दीपक पाठकचा आईला शेवटचा कॉल

बदलापूर – कात्रपमधील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहणारा दीपक पाठक (32) अपघातग्रस्त विमानात को-पायलट होता. दीपक हा गेल्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होता. आज दुपारी दीपकने आईला फोन केला होता. मात्र दुर्घटनेची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संवाद झाला नाही.

मैथिलीची अखेरची भेट

उरण –  पनवेलच्या न्हावा गावातील मैथिली पाटील (23) हिचादेखील या दुर्घटनेत समावेश असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियात ती एअर होस्टेस होती. गुरुवारी फ्लाईट असल्याने मैथिलीने बुधवारचा पूर्ण दिवस आईवडील व कुटुंबीयांसोबत घालवला. आज सकाळी मैथिली अहमदाबादला गेली. दुर्घटनेची माहिती मिळताच मैथिलीचे वडील, आई, मामा तातडीने दुर्घटनास्थळी रवाना झाल्याचे निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

रोशनीने केले स्वप्न पूर्ण

डोंबिवली – नव उमिया कृपा सोसायटीमध्ये राहणारी रोशनी सोनघरे (27) हिचादेखील दुर्घटनेत समावेश आहे. रोशनी ही फ्लाईटमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती. आईवडिलांची प्रतिकूल परिस्थिती असल्याने रोशनीने जिद्द आणि मेहनतीने अभ्यास करून यश संपादन केले होते.