
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातानंतर काही दिवसांतच कार्यालयात डीजे पार्टी देणाऱ्या एअर इंडिया सॅट्सच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली.
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. यात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला. देश अद्यापही या धक्क्यातून सावरला नसतानाच विमानतळावर सेवा देणारी एअर इंडियाची सहकारी कंपनी एअर इंडिया सॅट्सच्या काही अधिकाऱ्यांनी डीजे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील नाचगाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. याची दखल घेत कंपनीने शिस्तभंगाची कारवाई करत पार्टी आयोजित करणाऱ्या
4 अधिकाऱ्यांना घरी पाठवले.
अहमदाबादेतील अपघात हा आमच्यासाठीही एक धक्का आहे. आम्ही मृत प्रवाशांच्या कुटुंबीयाच्या सोबत आहोत. अशा प्रसंगी आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कृती दुःखद आहे. हे वर्तन कंपनीच्या नीतिमूल्यांना धरून नाही. त्यामुळे आम्ही कारवाईचे पाऊल उचलले आहे,’ असे एअर इंडिया सॅट्सने निवेदनात म्हटले आहे.