
एअर इंडियाने दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी दरम्यान थेट विमानसेवा 1 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामागे दोन कारणे आहेत. एअर इंडियाच्या 26 बोईंग 787-8 विमानांमध्ये अपग्रेडिंगचे काम सुरू आहे, ज्यामुळे बरीच विमाने लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी उपलब्ध राहणार नाहीत. हे काम 2026 च्या अखेरीपर्यंत सुरू राहील.
तसेच पाकिस्तानच्या हवाई हद्द बंद असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गांवर उड्डाणांचा वेळ वाढला आहे, तसेच परिचालकीय गुंतागुंतही वाढली आहे. यामुळे दिल्ली-वॉशिंग्टन मार्गावरील उड्डाणे चालवणे अधिक कठीण झाले आहे.
दरम्यान, हा निर्णय अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान अपघातानंतर दोन महिन्यांनी घेण्यात आला आहे. या अपघातात 242 पैकी 241 प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. तसेच जमिनीवरही 20 जणांचा बळी गेला होता. या घटनेनंतर सर्व ड्रीमलाइनर विमानांची इंधन स्विचसह इतर महत्त्वाच्या तपासण्यांना गती देण्यात आली आहे.