एअर मार्शल आशुतोष दीक्षित इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे नवे प्रमुख

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. इंटिग्रेडेट डिफेन्स स्टाफच्या मुख्यालयातील हे एक महत्त्वपूर्ण पद मानले जाते. दीक्षित हे 6 डिसेंबर 1986 रोजी हिंदुस्थानच्या हवाई दलात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, डिफेन्स स्टाफ कॉलेज, बांगलादेश आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली येथे शिक्षण घेतले आहे.

एअर मार्शल दीक्षित यांना 20 हून अधिक प्रकारच्या विमानांचा 3 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून ते कुशल लढाऊ वैमानिक आहेत. लेफ्टनंट जनरल जे. पी. मॅथ्यू यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. मॅथ्यू हे 30 एप्रिल रोजी निवृत्त झाले. पदभार स्वीकारण्यापूर्वी आशुतोष दीक्षित यांनी युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पांजली अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत दीक्षित यांनी विविध पदांवर काम केले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना अति विशेष सेवा पदक, विशेष सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक तसेच वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सीआयईएससीचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावर कार्यरत होते.