प्रदूषण रोखण्यासाठी ‘बेस्ट’वर एअर प्युरिफायर! 100 गाडय़ांवर बसवले फिल्टर; नैसर्गिक गतीवर चालणार यंत्रणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता ‘बेस्ट’च्या बसगाडय़ांवर ‘एअर प्युरिफायर’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. यामध्ये एकूण 200 गाडय़ांवर हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आज 100 गाडय़ांवर बसवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. नैसर्गिक गतीवर एअर प्युरिफायर चालणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. पालिकेच्या माध्यमातून हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात  येत असून आयआयटी, मुंबईसारख्या सहा तज्ञ एजन्सी हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत काम करीत आहेत. यामध्ये मुंबईत वाहनांपासून निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी वाहनांमध्ये ‘व्हेइकल माऊंटेड फिल्टर’ म्हणजेच धूर फिल्टर यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. शिवाय आता बेस्ट गाडय़ांच्या टपावर पुढच्या बाजूला एअर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये 100 युनिट महिंद्रा अँड महिंद्रा, तर 100 युनिट बीपीसीएलकडून बसवण्यात येतील.

अटल सेतूवरही एसी ‘बेस्ट’ धावणार

प्रवाशांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ अर्थात शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर मार्गावरही आता ‘बेस्ट’ची बस धावणार आहे. यामध्ये जागतिक व्यापार पेंद्र आणि कोकण भवन, सीबीडी बेलापूर दरम्यान एसी बसमार्ग क्र. एस-145 14 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये किमान भाडे 50 तर कमाल भाडे 225 रुपये राहील.

या मार्गावर सकाळी सीबीडी बेलापूर येथून आणि संध्याकाळी जागतिक व्यापार पेंद्र येथून बस चालवण्यात येतील. या बसचा प्रवास मार्ग जागतिक व्यापार पेंद्र – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पेंद्र (मंत्रालय)-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (जीपीओ)- पूर्व मुक्त मार्ग- अटल सेतू उड्डाणपूल- उलवे नोड – किल्ले गावठाण-बामण डोंगरी रेल्वे स्थानक-कोकण भवन, सीबीडी बेलापूर असा राहील.

अशी आहेत यंत्रणेची वैशिष्टय़े

ही यंत्रणा हवेमध्ये तरंगणारे कण काढून टाकेल.

मोबाईल एअर प्युरिफायर म्हणून काम करेल.

प्रतिदिन 12 ते 15 ग्रॅम तरंगणारे कण गोळा करणार

50 ते 60 हजार घनमीटर हवा शुद्ध करणार

नैसर्गिक गतीवर चालल्यामुळे विजेची गरज नाही

3 फिल्टरेशन स्तरापैकी 2 थर 6 महिन्यांनी धुता येतील.