दिवाळीत विमान प्रवास दुप्पट महागणार, डॉलरपुढे रुपयाने नांगी टाकल्याचा फटका

गणेशोत्सव संपल्यानंतर वेध लागतात ते दसरा आणि दिवाळीचे. दिवाळीच्या सुट्टीत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या भरमसाट असते, परंतु यंदाच्या दिवाळीत विमान प्रवास दुप्पट महाग होणार आहे. 19 ते 25 ऑक्टोबर या काळात प्रमुख देशांतर्गत मार्गावरील विमान भाडे मागील वर्षीच्या तुलनेत 52 टक्क्यांनी महाग होणार आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा फटका विमान प्रवाशांना बसणार आहे.

ट्रॅव्हल वेबसाइट इक्सिगोने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, यंदाची दिवाळी विमान प्रवासासाठी महाग ठरणार आहे. दिवाळी सणांच्या दिवसात मुंबई-पाटणा मार्गावरील सरासरी इकॉनॉमी भाडे 14 हजार 540 रुपये आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी आठवड्यात (30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर) ते 9,584 रुपये होते. म्हणजेच त्यात 52 टक्के वाढ झाली आहे.

बंगळुरू-लखनऊ मार्गावरील सरासरी भाडे 9 हजार 899 रुपये आहे. हे गेल्या वर्षी 6 हजार 720 रुपये होते. म्हणजेच या मार्गावरील भाडे 47 टक्के वाढले आहे. महिना-दीड महिना आधीच काढलेल्या विमान तिकिटाची ही किंमत आहे. जर ऐन दिवाळीत विमान तिकीट काढायचे असेल तर ते आणखी महाग ठरू शकते. यंदा दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विमान प्रवास 50 टक्क्यांहून अधिक महागल्याने या वर्षी प्रवाशांना आपला खिशा चांगलाच रिकामा करावा लागणार आहे.