तो दिवस दूर नाही… खेळाडूंचे विमान स्टेडियमवर उतरेल

न्यूझीलंडच्या स्वारीवर गेलेल्या ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली भरगच्च वेळापत्रकावर चांगलाच भडकला. ‘न्यूझीलंड व हिंदुस्थानातील वेळेत तब्बल सात तासांचा फरक आहे. अशा परिस्थितीत येथील वातावरणाशी जुळवून न घेता तीन दिवसांतच खेळणे त्रासदायक आहे. आता तो दिवस दूर नाही. खेळाडूंचे विमान थेट स्टेडियमवर उतरेल आणि आम्हाला सामना खेळावा लागेल, असा संताप विराटने व्यक्त केला.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 लढतीच्या पूर्वसंध्येला कोहली म्हणाला, न्यूझीलंड दौऱयावरील वेळापत्रक ‘टीम इंडिया’साठी त्रासदायक आहे. कारण ‘टीम इंडिया’ने 19 जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला. 20 जानेवारीला काही क्रिकेटपटू न्यूझीलंडमध्ये पोहोचले, तर उर्वरित 21 जानेवारीला दाखल झाले. ‘टीम इंडिया’ला लगेच 24 जानेवारीला न्यूझीलंडबरोबर पहिला टी-20 सामना खेळायचा आहे. त्यामुळे संघनिवडीपेक्षा येथील वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे असणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा त्रासदायक वेळापत्रकावर विचार व्हायला हवा. या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा असल्याने आता सर्वच लढती आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचे लक्ष भरकटू देणार नाही, असेही कोहलीने सांगितले.

टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात

हिंदुस्थान – न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्यापासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय देशांमधील पहिला सामना ऑकलंडला होईल. टी-20 मालिकेनंतर दोन देशांमध्ये तीन वन डे सामन्यांची आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडेल.

विराटच्या तक्रारीने ‘बीसीसीआय’ नाराज

न्यूझीलंड दौऱयाची क्रिकेटपटूंना आधीपासून कल्पना होती. त्यामुळे विराट कोहलीने प्रसारमाध्यमांसमोर भरगच्च वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त करायला नको होती. ‘बीसीसीआय’कडून खेळाडूंच्या हितांना प्राधान्य देऊनच योजना तयार केल्या जातात. त्याचाच भाग म्हणून आम्ही खेळाडूंना दिवाळीत सुट्टय़ा दिल्या होत्या. कोहलीला किंवा संघातील सहकाऱयांना काही समस्या असतील तर त्याने बोर्डाच्या सचिवांशी चर्चा करायला हवी होती. त्यामुळे कोहलीने थेट मीडियाशी अशा चर्चा करणे योग्य नाही, असे ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या