
दिवाळी, छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत. विमानाच्या तिकिटांची वाढती मागणी पाहता एअरलाइन्सने तिकीट दरात तीन ते पाच पट वाढ केली आहे. साधारणपणे लखनऊ-मुंबईचे तिकीट चार ते पाच हजार रुपयांना मिळते. मात्र आता हेच तिकीट 25 हजारांपर्यंत पोहोचले आहे. विमान कंपन्यांच्या मनमानीविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.
ट्रॅव्हल कंपन्यांच्या वेबसाईटवर लखनऊच्या उड्डाणांच्या सर्चमध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कुटुंबातील चार जणांचा लखनऊ-मुंबई विमान प्रवासासाठीचा खर्च एक लाख रुपये एवढा जात आहे. प्रवासी संघटनांनी केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
3 हजारांचे तिकीट 22 हजारांपर्यंत
लखनऊ-दिल्ली आणि लखनऊ-बंगळुरू या विमान मार्गावरील तिकीट दरदेखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लखनऊ-दिल्लीचे अडीच ते तीन हजार रुपयांना मिळणारे तिकीट आता 22 हजारांपर्यंत पोहोचले आहे. लखनऊ-बंगळुरू रुटवरही तिकीट दर 16 हजार ते 22 हजार रुपये झाले आहे.