
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या युद्धात इराणच्या 32 युद्धनौकांना जलसमाधी देण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यात ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेचाही समावेश आहे. हिंद महासागरामध्ये पाणबुडीतून पाणतीर मारून ही युद्धनौका बुडवण्यात आली. विशेष म्हणजे त्याच दिवशी इराणचे ‘आयआरआयएस लावन’ हे जहाज हिंदुस्थानच्या कोची बंदरावर पोहोचले होते. अचानक सुरू झालेल्या युद्धामुळे इराणने हिंदुस्थानकडे या जहाजाला तातडीने डॉकिंगची परवानगी मागितली होती आणि 1 मार्च रोजी ही विनंती मान्य करण्यात आली होती. त्यामुळे या जहाजावरील सर्व 183 कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. याबाबत आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही माहिती दिली असून त्यांनी सर्व घटनाक्रमच सांगितला आहे.
अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या नौदलाच्या जहाजाला कोचीमध्ये डॉक करण्याची परवानगी देताना हिंदुस्थानने भू-राजकीय गणितांपेक्षा मानवता या पैलूला अधिक महत्त्व दिले. ‘रायसीना डायलॉग’मध्ये बोलताना जयशंकर यांनी हिंद महासागरात अमेरिकन पाणबुडीकडून इराणचे दुसरे जहाज ‘IRIS डेना’ बुडवण्यात आल्याची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले.
IRIS लावन हे जहाज कोचीमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांनंतर 4 मार्च रोजी अमेरिकन पाणबुडीने IRIS डेना बुडवले. ज्यामध्ये 80 हून अधिक इराणी खलाशांचा मृत्यू झाला. श्रीलंकेच्या नौदलाने सुमारे 32 जवानांना वाचवले. या घटनेबाबत विचारले असता जयशंकर म्हणाले की, ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला सुरू केला, त्याच दिवशी इराणकडून हिंदुस्थानला विनंती प्राप्त झाली होती.
इराणच्या एका जहाजात तांत्रिक बिघाड झाला असून त्यात 183 कर्मचारी आहेत, ज्यामध्ये बहुतांश तरुण कॅडेट्स आहेत. हे जहाज फेब्रुवारीच्या मध्यात हिंदुस्थानने आयोजित केलेल्या ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026’ या सागरी सरावासाठी आले होते. सराव संपवून परतत असताना अचानक युद्ध सुरू झाले आणि हे जहाज संघर्षाच्या मधोमध अडकले. 1 मार्च रोजी हिंदुस्थानने इराणची विनंती मान्य केली आणि 4 मार्च रोजी ‘IRIS लावन’ कोचीमध्ये दाखल झाले. आम्ही या परिस्थितीकडे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले. कायदेशीर मुद्दे बाजूला ठेवून आम्ही जे केले ते योग्य होते असे मला वाटते, असे जयशंकर म्हणाले.
श्रीलंकेच्या अधिकारक्षेत्रात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आणि दुर्दैवाने त्यापैकी एक जहाज वाचू शकले नाही. ‘IRIS डेना’ने संकटाचा इशारा दिल्यानंतर हिंदुस्थानने शोध आणि बचाव कार्यासाठी सागरी गस्त विमान, INS तरंगिणी आणि INS इक्षक तैनात केले होते, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.

























































