… म्हणून आई व मी 8 किमी चालत जायचो, रहाणेने सांगितला खडतर प्रवासाचा किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2011 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाचा एक विश्वासू खेळाडू आहे. सध्या हिंदुस्थानचा कसोटीतील उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे हा हिंदुस्थानी क्रिकेटमधलं एक मोठं नाव झालं आहे. मात्र या 31 वर्षीय खेळाडूचा हा टीम इंडियापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अजिंक्यने नुकतंच एका कार्यक्रमात त्याच्या आयुष्यातील त्या खडतर दिवसांच्या आठवणी सांगितल्या. तसेच त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी घेतलेल्या मेहनतीचीही माहिती दिली.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्यने त्याच्या आईने त्याला चांगला क्रिकेटपटू बनवता यावा म्हणून कशी मेहनत घेतली आहे हे सांगितले आहे. ‘त्यावेळी मी डोंबिवलीला राहायचो. तेव्हा आमच्याकडे रिक्षासाठी पैसे नसायचे. मला आजही चांगलं आठवतं की माझ्या ट्रेनिंगसाठी मी व आई दररोज सात आठ किलोमीटर चालत जायचो. आईच्या एका हातात मी व दुसऱ्या हातात माझा छोटा भाऊ असायचा. कधी कधी मला चालायचा कंटाळा यायचा. मी आईला रिक्षाने जाऊया सांगायचो. पण पैसे नसल्याने ती देखील काय बोलणार. त्यामुळे मग आम्ही आठवड्यातून एकदा रिक्षाने जायचो’, असे अजिंक्यने सांगितले.

‘आज मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. त्यांनी मला इथवर आणण्यासाठी खूप काही केलंय. आता माझं स्वप्न आहे की मी त्यांच्यासाठी काहीतरी करावे. मी सात वर्षांचा असल्यापासून क्रिकेट प्रॅक्टिससाठी सीएसएमटीला जायचो. पहिल्या दिवशी माझे वडील माझ्यासोबत होते. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की आता यापुढे मलाच दररोज असा प्रवास करायचा आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला डोंबिवली स्टेशनला सोडले व ते निघून गेले. मी एकटाच प्रवास करत होतो पण नंतर मला समजलं की माझे वडील दुसऱ्या बोगीतून माझ्यावर लक्ष ठेवून होतो. ज्या दिवशी त्यांना खात्री पटली की मी व्यवस्थित प्रवास करतोय. त्यानंतर त्यांनी मला एकट्याला जाऊ दिलं’, असं अजिंक्यने या मुलाखतीत सांगितलं.

सध्या अजिंक्य रहाणे टीम इंडियासोबत न्यूझीलंडला असून तिथे तो कसोटी सामने खेळत आहे. कसोटी फॉर्मचा अजिंक्य उपकर्णधार असून शनिवारी सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने अर्धशतक केले आहे.