
सामना ऑनलाईन । मुंबई
विंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून माजी कर्णधार एम.एस. धोनीला वगळण्यात आले. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी धोनीचे वय पाहता हा निर्णय योग्य असल्याचे तर काहींनी त्याच्या अनुभवाकडे बोट दाखवत निर्णय कसा चुकीचा आहे हे बोलून दाखवलं. आता हिंदुस्थानचा माजी खेळाडू अजित आगरकरने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचे आगरकरने म्हटलं आहे.

आगरकर म्हणाला की, ‘2020 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून तरुण खेळाडू ऋषभ पंतला संधी देण्याची आवश्यकता आहे. धोनीला पर्याय म्हणून पंतकडे पाहिलं जात आहे त्यामुळे त्याला पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता आहे. तसेच संघात निवड होण्यासाठी चांगल्या कामगिरीचा निकष असेल तर निवड समितीचा धोनीला वगळण्याचा निर्णय योग्य आहे. धोनीचा टी-20 मधील फॉर्म खराब असून त्याचा विक्रम आणि नाव पाहून त्याची संघात निवड होऊ शकत नाही.’
दरम्यान, विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या एक दिवसीय मालिकेत धोनीचा फॉर्म यथातथाच आहे. तरीही 2019 मध्ये होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकात त्याची जागा पक्की मानली जात आहे. अनेक माजी खेळाडूंचंही हेच मत आहे. कारण मैदानात विराटला धोनीचे मार्गदर्शन उपयुक्त पडत आहे.





























































