
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. संघ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, ‘पंत अद्यापी पूर्णपणे तंदुरुस्त नाहीये, मात्र त्याच्यात अपेक्षेपेक्षा झपाट्याने सुधारणा सुरू आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत पंत पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे,’ असेही आगरकर यांनी सांगितले. आगरकर म्हणाले, ‘ऋषभ पंत टीम इंडियाचा उपकर्णधार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. दुर्दैवाने तो विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. आम्हाला अपेक्षा आहे की, तो दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी उपलब्ध असेल.’ या विधानाने पंतच्या फिटनेसविषयीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून संघ व्यवस्थापनाची रणनीतीही स्पष्ट झाली आहे.