लेख – सोन्याला भाव : सोने तारण कर्जाला वाव

>> अजित कवटकर

सर्वसामान्यांनी साठवून ठेवलेलं सोनं हे त्यांना अनेक प्रकारे आधार देणारे व उत्पादनक्षम ठरणार आहे. यातील अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे ‘सोने तारण कर्ज’. सोन्याच्या आजच्या किमतींमुळे सोने तारण कर्जदाराला ‘कर्ज ते मूल्य गुणोत्तर’ प्रमाणात आधीपेक्षा अधिकची प्राप्ती होऊ शकते. जिथे इतर तारण कर्जासाठी हे गुणोत्तर 50 ते 60 टक्के असते, तिथे सोने तारण कर्जाला 80 ते 85 टक्के प्राप्त होते.

सोन्याच्या मोहिनीची भुरळ इतकी की, त्याचा सर्वांनाच नाद लागला आहे. कमालीची लवचिकता, गंज प्रतिकारक आणि निसर्गात अतिशय शुद्ध रूपात प्राप्त होणारे. दोष मात्र दोनचः दुर्मिळता आणि त्यामुळेच फार मौल्यवान. पौराणिक कथांमधून, प्राचीन साहित्यामधून ’स्वर्णा’प्रति चालत आलेले आकर्षण लक्षात घेता या धातूबरोबर मानवाचे संबंध हे हजारो वर्षांपूर्वीपासूनचे आहेत हे अधोरेखित होते. असे म्हणतात, सुवर्णास प्राचीन इजिप्त संस्पृतीने उल्लेखनीय पद्धतीने सर्वप्रथम जगासमोर सादर केले. त्यासमयी इजिप्तमधील काही प्रसिद्ध पिरॅमिड्सची शिखरं ही शुद्ध सोन्याची होती असा उल्लेख त्यांच्या पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. तसेच तुर्पस्तानातील एका प्राचीन संस्पृतीमध्ये कनकाचा वापर चलन म्हणून सर्वप्रथम केला गेला असा कयास आहे. कांचनाकडे  सामाजिक प्रतिष्ठा आणि पत म्हणून बघण्याची सवय ही ग्रीकांनी घालून दिली आणि आता तर संपूर्ण जग त्या मापदंडाचे अनुकरण करत आहे. आपल्या प्राचीन भारतीय साहित्यामध्येदेखील याचा केला गेलेला शक्तीरूपी उल्लेख हा याचे महत्त्व दर्शवतो. या सगळ्याची प्रचीती आज त्याच्या मागणी व किमतीने गाठलेल्या विक्रमी उच्चांकांवरून येते. सोन्याची सर्वाधिक मागणी व आयात करणाऱ्या देशांत भारत दुसऱ्या क्रमांकावर असणे यावरून या धातूविषयी आपली आसक्ती व आकर्षण दिसून येते, परंतु आपली आजची अर्थव्यवस्था आणि देशाच्या व्यापार संतुलनाच्या दृष्टीने हे कितपत मारक वा सहायक ठरू शकते? तसेच या धातूचा वापर केवळ दागिने बनवून ते तिजोरीत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते हस्तांतरित करण्यासाठीच होणे योग्य वा व्यवहार्य आहे का?

भारतीय संस्पृतीसाठी सोनं म्हणजे मानसन्मान, प्रतिष्ठा होय. त्याचा संचय करणे व शुभ प्रसंगी त्याचे आभूषणांच्या रूपात प्रदर्शन करून त्याद्वारे स्वतःची कीर्ती वाढवणे, श्रीमंतीची ताकद दाखवणे, उच्च सामाजिक स्तराचा पुरावा देणे आणि या सगळ्यासाठी सुवर्णाहून श्रेष्ठ इतर काही क्वचितच होते. त्यामुळे त्यासमयी गुंतवणूक म्हणून याचा वापर वा व्यापार हा काही विशिष्ट सामाजिक, व्यापारी वर्गच करायचा. त्यासाठीच अनेकदा या धातूच्या संचयनाला ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ म्हणून पण बोल लावले गेले, परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. भारतातील त्याच्या प्रतितोळा किमतीचा चढता आलेख बघितला तर आजच्या अर्थव्यवस्थेत याहून अधिक फायदेशीर गुंतवणूक अभावानेच सापडेल. सन 2000 ला याची सरासरी किंमत होती रु.4400, सन 2010 ला रु.18,500, सन 2020 ला रु. 48000 च्या आसपास, सन 2025 च्या ऑक्टोबर महिन्यात याच्या दराने रु.1,27,000 चा उच्चांक गाठला. आजच्या अस्थिर जागतिक वातावरणात सोनं हे गुंतवणुकीसाठी सर्वात ‘सेफ आणि रिलायबल’ म्हणून स्थिरावत आहे. कमजोर होणारा डॉलर, वाढत असलेला भौगोलिक राजकीय ताणतणाव, सेंट्रल बँकांकडून वाढणारी सोन्याची मागणी, यूएस फेडरल रिझर्व्हकडून करण्यात आलेली दरकपात, वर्षाला जवळपास 3000 टन एवढीच जागतिक निर्मिती तसेच आर्थिक व राजकीय अस्थिरतेत – अस्वस्थतेत हीच गुंतवणूक सर्वांना सुरक्षित, भरवशाची, विसंबण्याजोगी वाटणे या आणि अशा इतर अनेक कारणांमुळे सोन्याच्या किमतीत कमालीची घोडदौड बघायला मिळत आहे.

भारतामध्ये सोनं हे देवी लक्ष्मी, उन्नती, आशीर्वादाचे प्रतीक आहे. येथील लग्नकार्य तर त्याशिवाय अशक्यच! भेट म्हणून दिले गेलेले सोन्याचे दागिने व वस्तू यांच्याशी एक भावनिक नाते निर्माण होते आणि एक सांस्पृतिक वारसा म्हणून ते पिढ्यान्पिढ्या राखून ठेवण्यात येते आणि ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून अजून अधिक नवीन विकत घेतले जाते. त्यामुळेच याचा देशातील घरगुती साठा हा फार प्रचंड आहे. ‘अक्षय तृतीये’सारख्या अनेक सणांनी तर याच्या खरेदीची प्रथा – परंपरा प्रस्थापित केली आहे. ग्रामीण भागांमध्ये तर बँकिंग व्यवस्थेपेक्षा लोक यावरच अधिक विश्वास ठेवून ते मालमत्तेच्या रूपात स्वताच्या हाताशीच ठेवणे पसंत करतात. या ना त्या कारणांसाठी त्यामुळे येथील प्रत्येक स्तरावरील माणसाकडून आपल्या पुवतीनुसार थोडंबहुत सोनं खरेदी केले जातंच, मग किंमत किती का असेना ! त्यामुळे जागतिक स्तरावर सर्वाधिक सोनं आयात व उपभोग करणाऱ्यांमध्ये भारत हा वरच्या क्रमांकावर आहे, परंतु याचा प्रतिपूल परिणाम हा भारताच्या व्यापार संतुलनावर होत असल्याचे दिसत आहे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता मग आयात निर्बंध वा इतर फायदेशीर गुंतवणुकीसाठीच्या सरकारी योजना आणल्या जातात. त्यामुळे वर्षानुवर्षे तिजोरीत पडून राहिलेल्या जुन्या सोन्याच्याच नव्या घडवणीतून पुनर्वापर करण्याची सवय रुजल्यास हे अर्थव्यवस्था व व्यापार संतुलनाच्या दृष्टीने अधिक हितकारक ठरेल, असे मत अनेक जाणकारांनी अनेकदा मांडले आहे.

सोन्याने गाठलेल्या उच्चांक दराच्या परिणामांची दुसरी बाजू पाहता आज आपल्या सांस्पृतिक – पारंपरिक सवयींमुळे का होईना, पण सर्वसामान्यांनी साठवून ठेवलेलं सोनं हे त्यांना अनेक प्रकारे आधार देणारे व उत्पादनक्षम ठरणार आहे. यातील अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे ‘सोने तारण कर्ज’. सोन्याच्या आजच्या किमतींमुळे सोने तारण कर्जदाराला ‘कर्ज ते मूल्य गुणोत्तर’ प्रमाणात आधीपेक्षा अधिकची प्राप्ती होऊ शकते. जिथे इतर तारण कर्जासाठी हे गुणोत्तर 50 ते 60 टक्के असते, तिथे सोने तारण कर्जाला 80 ते 85 टक्के प्राप्त होते. त्याशिवाय या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या कमी व्याजदराचा ‘व्रेडिट स्कोअर’वर कसलाही परिणाम होत नाही; हे कर्ज ताबडतोब अर्जदाराला वितरित केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गहाण ठेवलेले सोनं ही बँकेची जबाबदारी असते, जे त्यांच्या ‘सेफ डिपॉझिट वॉल्ट’मध्ये सीलबंद व सुरक्षित राहते. एकीकडे कर्जदार त्या सोन्यावर मिळालेल्या कर्जाचा कार्यक्षम वापर करून परिस्थिती अधिक अनुपूल करत असतो, तर दुसरीकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची किंमत अधिक वाढत राहिली तर त्याच्या मालमत्तेचे मूल्यदेखील त्या कालावधीत वृद्धिंगत होत असते. खोल अवकाशातून पृथ्वीच्या खोल भूगर्भात असा प्रवास करणारा ‘सुवर्ण’ मानवासाठी अनन्यसाधारण आहे. दुर्मिळ, तेजस्वी, दैवी असलेल्या सोन्याची मनुष्याला असलेली अभिलाषा सनातन आहे.सौंदर्य, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या या धातूसाठी मानवाने जंग जंग पछाडले, पछाडत असतो. मानव आजपर्यंत सोन्याचा जो आदर – सन्मान करत आला आहे त्याचीच परतफेड म्हणून की काय, या सदैव इष्ट असणाऱ्या या धातूने आज त्या सर्वांना भारी फायदा मिळवून दिला, देत आहे. ‘सोन्याला भाव, सोने तारण कर्जाला वाव’ ही त्यातूनच सर्वसामान्यांसाठी निर्माण झालेली एक अधिक फायदेशीर संधी होय.

[email protected]