तीन महिन्यांत सातबारा कोरा नाही केला, तर पवारांची अवलाद सांगणार नाही

71965
ajit-pawar-sangli

या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकर्‍यांवर संप करण्याची वेळ आली आहे. भाजपचे हे सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे आमच्या हाती सत्ता द्या, पहिल्या तीन महिन्यांत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा नाही केला तर पवारांची अवलाद सांगणार नाही, अशी फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

माळशिरसमधील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पवार यांनी माळशिरसच्या बदलत्या राजकारणाचा संदर्भ देत जोरदार टीका केली. 2009 च्या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करण्यासाठी आम्ही सभा घेतल्या, पण आता आम्ही तुमच्याबरोबर आहात. त्यामुळे अडचण उरलेली नाही. प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे, असे सांगत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांना त्यांनी आव्हान दिले.

अच्छे दिनचे गाजर दाखविणारे हे सरकार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिला आणि तरुणांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याची टीका त्यांनी केली. शिखर बँक प्रकरणात चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करत ईडीने दाखल केलेला गुह्यातील विसंगतीची माहिती अजित पवार यांनी दिली.

करमाळ्यात अपक्ष, तर सांगोल्यात शेकापला पाठिंबा

करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अर्ज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही, मात्र तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदकार डॉ. अनिकेत देशमुख यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असल्याची माहिती पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या