
आमदारकीचा राजीनामा व त्यानंतरच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये ऑक्टिव्ह झाले असून आज रात्री विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या जागावाटपाच्या बैठकीला उपस्थिती लावली आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील जागवाटपाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, नसीम खान तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, जीतेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे शुक्रवारपासून जागावाटपाच्या बैठकीला खीळ बसली होती पण अजित पवार यांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेनंतर नाराजीनाटय़ावर पडदा पडला आणि पुन्हा जोरबैठका सुरू झाल्या. आघाडीतील जागावाटप व उमेदवारीवर या बैठकीत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 100 उमेदवार निश्चित केले आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी शिवसेना-भाजप युतीची घोषणा व उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यावर प्रसिद्ध करण्याची रणनीती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आखली असल्याचे या बैठकीला हजर असलेल्या एका नेत्याने सांगितले. जागावाटपाची ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या बंगल्याबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



























































