सामना ऑनलाईन, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या ट्विटरवर भलतेच सक्रीय झाले आहेत. अजित पवार विविध मुद्द्यांवरून सत्तापक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असतात, मात्र अजित पवार सत्तेत असताना त्यांनी केलेल्या विधानांमुळे आणि कृतींमुळे हे प्रयत्न बुमरँग होताना दिसतायत. अजित पवार यांनी दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला होता, त्यावेळी ट्विटरवरून त्यांना मावळमधला गोळीबार विसरलात का ? हा प्रश्न अनेकांनी विचारला होता. तशीच परिस्थिती अजित पवारांवर पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी केलेल्या ट्वीटमुळे ओढावली आहे.
हिंदी वृत्तवाहिनीच्या एका वरिष्ठ पत्रकाराने स्टींग ऑपरेशनमुळे चिडून जाऊन पत्रकारांना धमक्या दिल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. हे ट्वीट पाहून अजित पवारा यांनाही प्रचंड संताप आला आणि त्यांनी पत्रकारांना धमक्या दिल्या जात असल्याबद्दल सरकारला खडसावण्याचा प्रयत्न केला.
काय चालू आहे राज्यात? पत्रकारांना सरळसरळ धमक्या दिल्या जात आहेत. सनातन संस्थेवर कारवाई का नाही? आमच्या काळात आम्ही बंदीचा प्रस्ताव पाठवला होता, पण आता काय करत आहे @Dev_Fadnavis सरकार? संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार? कसली वाट बघताय? #BanSanatan https://t.co/QJarjqhyAa
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 14, 2018
अजित पवार यांनी हे ट्वीट करताच एका ट्विटर वापरणाऱ्याने अजित पवारांना गुगली टाकत त्यांनीच केलेलं एक विधान लोकांपर्यंत पुन्हा पोहचवलं.
“यांना नुसते दंडुक्यांनी ठोकलं पाहिजे”अशी धमकी दिली होती एका नेत्याने! त्यावर मीडियाने बहिष्कार टाकला होता.असो.सर्व माहीत आहे सर्वांना!!
— Santosh Ghuge (@GhugeSantosh1) October 15, 2018
सत्तेत असताना अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांपैकी एक विधान हे पत्रकारांना दांडक्याने ठोकून काढा असं होतं. त्यांच्या या विधानामुळे राज्यात बरीच खळबळ उडाली होती. पत्रकारांनी अजित पवारांच्या सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकार परिषदांवरही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या पवित्र्यामुळे अजित पवार यांनी आपल्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणत दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता.





























































