दादा गटाचे आमदार शरद पवारांना पुन्हा भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारच्या भेटीत काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अजित पवार गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सलग दुसऱया दिवशी पुन्हा भेट घेतली. आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 30 आमदार होते. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि 30 आमदारांचा ताफा आज दुपारी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचला. सुमारे दीड तास ती मंडळी पवारांसह बसून होती. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘काल आम्ही काही मोजकेच लोक शरद पवारांना भेटलो होतो. आज इतरही आमदारांनी त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आम्ही आजही आलो. राष्ट्रवादी पक्ष एकसंध रहावा यासाठी मार्ग काढा, अशी विनंती आम्ही शरद पवारांना केली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले,’ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. शरद पवार यांच्याकडून काय प्रतिसाद आला असे माध्यमांनी विचारले असता, ‘आता त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकणार?’ असे पटेल म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल

अजितदादा गटाच्या भेटीनंतर शरद पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘भाजपसोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल,’ असे ते म्हणाले.

भेटण्यात गैर नाही… पण साहेबांची भूमिका स्पष्ट

‘लोकांनी शरद पवार साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले. ते येऊन भेटत असतील तर त्यात गैर नाही. पक्षविरोधी कृती केल्यामुळे ओढावलेल्या परिस्थितीतून मार्ग काढावा, अशी विनंती अजितदादांसह अन्य सहकाऱयांनी पवार साहेबांकडे केली. परंतु शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे,’ असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

9 मंत्र्यांना अपात्रतेची भीती

राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली आहे. कारवाईच्या भीतीपोटीच सलग दुसऱया दिवशी दादा गटाने शरद पवार यांचे पाय धरले असे बोलले जात आहे. पवारांनीच आता यावर तोडगा सुचवावा, असे या सर्वांचे म्हणणे आहे. मात्र पवारांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत.

शरद पवार हे अजितदादा गटातील आमदारांशी राजकीय विषयांवर काहीच बोलले नाहीत. मात्र शेतकरी आणि पाऊस पाण्याबद्दल त्यांनी आवर्जून विचारपूस केली. तुमच्या भागात पेरण्या झाल्या का, असा प्रश्न त्यांनी आमदारांना विचारला.