चंद्रकांतदादांना पुणेकर अजूनही कोल्हापूरचेच समजतात! अजितदादांनी डिवचले

‘चंद्रकांतदादांना अजून आमचे पुणेकर कोल्हापूरचेच समजतात. ते पुण्याचे वाटतच नाहीत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना भरकार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच डिवचले.

अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून चंद्रकांतदादांच्या बाबतीत, ‘जरा तुम्ही लक्ष घाला देवेंद्रजी ! तुम्ही सगळीकडे लक्ष घालता आणि इथेच लक्ष घालत नाहीत,’ असे अजित पवार यांनी म्हणताच लगेच फडणवीसांनीही, ‘तुम्ही त्यांना पुण्याचे पालकमंत्री होऊ दिले नाही म्हणून,’ असे उत्तर दिले. त्यावर अजित पवार यांनीदेखील, ‘माझ्याआधी ते पालकमंत्री होते. तसंच तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुला पुण्याचा पालकमंत्री करणार आहे, म्हणून मी आलो,’ असेही जाहीरपणे सांगून टाकले. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

निवेदिकेने ‘लोकमान्य टिळकांचं त्यांच्या कुटुंबातील आणि मित्र परिवार मंडळींतील नाव ‘दादा’ होतं. त्यांना अनेक लोक ‘दादा’ म्हणत,’ असे सांगितले. पुढे ‘आज आपल्या व्यासपीठावरही दोन ‘दादा’ आहेत. एक अजितदादा आणि दुसरे रोहितदादा,’ असे निवेदिका म्हणताच रोहित टिळक यांनी शेजारीच बसलेल्या चंद्रकांतदादांकडे हात दाखवत, ‘मी नाही’ असे म्हणून चंद्रकांतदादांचे नाव घेण्याचा इशारा केला. त्यानंतर मग निवेदिकेने चंदकांतदादांचा उल्लेख केला.

अजित पवार यांनी भाषणात त्याचा संदर्भ देत, ‘निवेदिका पुण्याच्याच आहेत का?’ असा सवाल करीत ते म्हणाले, ‘त्या दोन ‘दादा’ म्हणाल्या. चंद्रकांतदादांना अजून आमचे पुणेकर कोल्हापूरचेच समजतात. ते पुण्याचे वाटतच नाहीत. त्यात जरा तुम्ही लक्ष घाला देवेंद्रजी,’ असे सांगून हा विषय उकरून काढला. हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ‘पुण्याचे तिसरे दादा’ असा चंद्रकांत पाटलांचा उल्लेख करीत अजित पवार यांना निर्देश करून, ‘चंद्रकांतदादांना तुम्ही परत कोल्हापूरला पाठवताय की काय?’ अशी टिप्पणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘पुण्यात अजितदादा आणि चंद्रकांतदादा असे दोन ‘दादा’ आहेत. दुसरे ‘दादा’ कधीही ‘दादा’गिरी करीत नाहीत. काही ल ोक दादागिरी करीत नाहीत, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून तसे दिसते,’ असे सांगून चंद्रकांतदादांची पाठराखण केल . मात्र, लगेचच अजित पवार यांनी, ‘म्हणजे मी दादागिरी करतो का?’ असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला.

पुणेकरांवर मिश्कील टिप्पणी

अजित पवार यांनी आपल्या भाषणात गमतीगमतीने पुणेकरांवरदेखील आपला राग आळविला. ते म्हणाले, ‘अनेकजण गडकरींकडे जातात. नाश्त्याची वेळ असेल तर नाष्टा करतात, जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात. आपल्या पुणेकरांसारखे नाही. ‘तुम्ही नाश्ता करूनच आला असाल, तुम्ही जेवण करूनच आला असाल…’ असे पुणेकर पाहुण्यांना विचारतात.’ आपल्या या बोलण्याला मिश्कीलपणा देऊन, ‘गमतीचा भाग जाऊ द्या, मला पुण्यात राहायचंय…’ अशी टिप्पणी त्यांनी केल्यानंतर एकच हशा पिकला.