पारनेरच्या पाच नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश दिला, अजित पवार यांचे स्पष्टीकरण

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, पण ते शिवसेनेचे नगरसेवक असल्याचे समजल्यानंतर त्या नगरसेवकांना परत शिवसेनेत जायला सांगितले, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना एकमेकांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पक्षात न घेण्याचा दंडक आम्ही पाळला होता. महाविकास आघाडीतही तोच शिरस्ता आम्ही पाळू असेही त्यांनी स्पष्ट केले.

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पाचही नगरसेवक शिवसेनेत स्वगृही आले. या संदर्भात अजित पवार यांनी प्रसिध्दी माध्यमांकडे सविस्तर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी बारामतीला गेलो होतो. तिथे गर्दी होती.नेहमीप्रमाणे मी सगळयांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा असे सांगितले. तेव्हा पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्याला भेटायला आल्याचा संदेश मला मिळाला. त्यांना मी लगेच बोलावले. निलेश लंके म्हणाले, पाच अपक्ष नगरसेवक आपल्या पक्षात येऊ इच्छितात, त्यांना आपण प्रवेश द्या. मी पण लगेच पक्षाचे उपरणे त्या नगरसेवकांच्या खांद्यावर टाकले. नंतर मला समजले की ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यानंतर मी त्यांना परत शिवसेनेत पाठवले. आम्ही आघाडीचा धर्म नेहमीच पाळतो असे त्यांनी स्पष्ट केले.

गैरसमजातून घडलेला प्रकार
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. पारनेरच्या त्या पाच शिवसेना नगरसेवकांबाबत ते मला काहीच बोललेले नाहीत. केवळ गैरसमजातून तो प्रकार घडला. माझ्या मनालाच तो नंतर न पटल्याने मी या नगरसेवकांना परत शिवसेनेत जायला सांगितले, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या