
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर विरोधकांकडून गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. या आरोपांना अजित पवार हे उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. त्याची सगळी कागदपत्रेदेखील आहेत. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन किती कारखाने कुणाच्या कारकीर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन, असा इशारा अजित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.
विरोधकांच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना ही केस ईडीकडे आहे. कोर्टात प्रकरण आहे. भाजपाचं सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली. ईओडब्ल्यूचीही चौकशी झाली. सहकार विभागाने निवृत्त न्यायाधीशांमार्फतदेखील चौकशी केली. राज्यात फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. किती कारखाने, कुणाच्या कारकिर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने 3 कोटी, 4 कोटी, 12-15 कोटी अशा किमतीला विकले गेलेत. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोलले जात नाही, पण माझ्या नातेवाईकांबद्दल बोलले जाते’, असेदेखील ते म्हणाले.
आमच्या रक्तात बेइमानी नाही
आजही राज्यात 12-13 कारखाने चालवायला देण्याचे टेंडर निघाले आहे. 20-25 वर्षे कारखाने चालवायला दिले जातात अशी वस्तुस्थिती आहे. पण काहीजण जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतात. आम्ही प्रत्येक वेळी माध्यमांसमोर जात नाही. मी वस्तुस्थितीला धरून चालणारा माणूस आहे. माझ्याविरुद्ध काही लोकांनी गरळ ओकण्याचंदेखील काम केलं की, मी बेइमानी केली. मी 90 सालापासून राजकारणात काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो, मी बेइमान आहे की, शब्दाचा पक्का आहे. माझ्या आयुष्यात मी कधी बेइमानी केली नाही. आमच्या रक्तामध्ये बेइमानी नाही’, असे अजित पवार विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.
शेतकऱयांशी अन्यायाने वागल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीकविम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱयांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघडय़ा डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. शेतकऱयांना पीकविमा देताना विमा कंपन्या शेतकऱयांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही,’ असा सूचक इशारा अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.





























































