Ajit Pawar plane crash – राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून उड्डाण घेतलेले त्यांचे विमान बारामतीत लँडिंग करताना कोसळले. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज सकाळी अतिशय दु:खद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची वार्ता सगळ्यांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली.

अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचे नेतृत्व होते. सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण आहे. कारण अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते होते, अशा काळात त्यांचे निघून जाणे अविश्वसनीय, मनाला चटका लावणारे आहे. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे.

सकाळपासून सगळ्यांच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दु:ख व्यक्त केलेले आहे. एकूणच देशात या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ परसलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सकाळी सुप्रिया सुळेंशी बोलणे झाले, त्यानंतर पार्थ पवारांशी बोलणे झाले. संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील. महाराष्ट्रामध्ये आज शासकिय सुट्टी घोषित केली आहे. त्या सोबत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल. पण कधीही भरून न येणारे नुकसान आहे, असे फडणवीस म्हणाले.