
जे शिवसेना सोडून गेले ते आजपर्यंत कधीच परत निवडून आले नाही, हा इतिहास आहे. जे सत्त्तेसाठी गुवाहाटी,गोव्याला पळून गेले होते त्यांनी त्याच वेळी राजीनामा देत परत निवडून येण्याची हिंमत दाखवायला हवी होती, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तिसगावसह तेहतीस गावांच्या पाणीयोजनेला मंजुरी दिल्याबद्दल अजित पवार व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा लाभार्थी गावातील प्रतिनिधींच्या हस्ते तिसगाव येथे सत्कार करण्यात आला या वेळी ते बोलत होते.
या अजित पवार म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरील त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे आपले वारसदार असल्याचे सांगिलते होते. जे निघून गेले त्यांनी तरी याचा विचार करायला हवा होता. याआधीही शिवसेना फुटली होती. मात्र जे निघून गेले ते निवडून आले नाहीत. त्या नंतरही काहीजण गेले पण त्यांना मागच्या दाराने पदे घ्यावी लागली. जनता ठाकरे यांचे नाव पाहून मत देते, असेही अजित पवार म्हणाले.
कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने खूप चांगले काम केल्याने अनेकांचे जीव वाचले. सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगा समोर खटला चालू असतानाही सत्तेवर आलेले हे सरकार घटनाबाह्य आहे. सध्याचे राज्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे बेताल वक्तव्ये करत महापुरुषांचा अवमान करत आहे. हे सरकार सत्तेवर येऊन अनेक महिने झाले असले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने काही आमदारांनी सूट शिवून घेतले आहे तर काहींनी देवाला मंत्रिपद मिळावे म्हणून नवस केले आहेत.सध्या त्रेचाळीस मंत्री पाहिजे होते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची यांनी भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था आपण या पूर्वी कधी पहिली नव्हती.सरकार येतात व जातात कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, असेही ते म्हणाले.
महिलांचा सन्मान करा असे हे म्हणातात. मात्, यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री का नाही, असा सवालही त्यांनी केला. आगामी पुण्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आजपर्यंत अनेक पंतप्रधानांचा कारभार देशाने पहिला मात्र राज्याराज्यात तोडफोड करून सत्ता मिळवणारे मोदी हे पाहिले पंतप्रधान असल्याचे ते म्हणाले.

























































