आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर…! मुश्रीफ यांच्यावरील ईडी धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करू नये’, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत उत्तर देताना केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यात आयकर, ईडी, एनआयए, सीबीआय असेल त्यांना देशातल्या कुठल्याही व्यक्तिची चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार संविधान, घटना, कायदा, नियम यांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे सरकार काम करतं, त्या सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या तपास यंत्रणा मग सीआयडी असेल किंवा एसीबी असेल किंवा पोलीस विभाग असेल, या सगळ्या एजन्सीना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तर चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण, हे आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर काही राजकीय रंग आहे का, अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होते’, असं ते म्हणाले.

‘शेवटी कोणाची चौकशी झाली तर त्यांना उत्तर देणं, चौकशी करता जे संबंधित अधिकारी येतात त्यांना सहकार्य करणं हे हिंदुस्थानी नागरिक म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, त्याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही. पण, नाहक त्रास होता कामा नये’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवरील कारवाईची आठवण देखील करून दिली आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांवर काही आरोप झाले पण नंतर जे आरोप केले गेले त्याला कोणतेही पुरावे दिले गेले नाहीत, असं त्यांनी लक्षात आणून दिलं.

‘न्यायव्यवस्थेला जो काही अधिकार आहे, त्या अधिकारांचा वापर करून त्यांना सोडलं आहे. मग त्यांना का अटक केली होती. तीच गोष्ट संजय राऊतांबद्दल. राऊतांना काही दिवस अटक केली. त्यानंतर ते पुन्हा जामिनावर बाहेर आले’, अशी आठवण त्यांनी करून दिली.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांपैकी कोकणातील आमदार राजन साळवी, विदर्भातील आमदार नितीन देशमुख आणि कोकणातीलच सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक या तिघांवर एसीबीच्या चौकशा लावण्यात आल्या’, असं अजित पवार म्हणाले.

अशा प्रकारच्या ज्या घटना घडताहेत. ते एकंदरितच आपल्या महाराष्ट्राला किंवा देशाला परवडणारं नाही. अशा प्रकारचे राज्यकर्ते वेगवेगळे मान्यवर येत असतात. जनतेला ज्यांना निवडून द्यायचं आहे, जनता त्यांना लोकशाही पद्धतीने देत असते. त्यांनी लोकशाही मार्गाने सरकार स्थापन करून चालवलं पाहिजे, असा सल्ला पवारांनी दिला.

नियम कायदा संविधान घटना सगळ्यांना सारख्या असल्या पाहिजेत!

तुम्हाला आठवत असेल, काही मान्यवरांनी जे पूर्वी आमच्याबरोबर किंवा आघाडीसोबत होते. पण, ते आता सत्ताधारी पक्षात गेले. त्यांनी स्वतःच हे विधान केलं होतं की आम्ही सत्ताधारी पक्षात आलेलो असल्याने आम्हाला शांत झोप लागते. हे आम्ही म्हणत नाही. हे ते स्वतः बोलतात. मागे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पूर्वी काँग्रेसमध्ये होते, ते नंतर भाजपमध्ये गेले. तेही बोलले होते. त्याआधी एक सांगलीचे खासदार, त्यांनीही त्याच पद्धतीने वक्तव्य केलं होतं. मी आता भाजपचा खासदार असल्यामुळे मला तशी काही अडचण नाही. अशी वक्तव्य आल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. प्रश्न निर्माण होऊन अशा प्रकारची जागा निर्माण होता कामा नये. शेवटी नियम कायदा संविधान घटना सगळ्यांना सारख्या असल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे, असंही त्यांनी सांगितलं.