अकोला जिल्ह्यात 3 दिवस कडकडीत लॉकडाऊन, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

479

अकोला जिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवार (दि.17) च्या संध्याकाळी सात वाजेपासून शनिवार (दि.18), रविवार (दि.19) व सोमवार (दि.20) ते मंगळवार (दि.21) च्या सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

याबाबत अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडनिस, अपर पोलिस अधिक्षक निकम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी शेलार, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांची उपस्थिती होती.

अकोला जिल्हयात कोविड-१९ विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे वाढती रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता,  कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्‍यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे असल्‍यामुळे व विषाणुमुळे उद्भवलेल्‍या संसर्ग रोगाच्‍या नियंत्रणास्‍तव आपत्‍कालीन उपायोजना करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाल्‍यामुळे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा – २००५ , साथरोग अधिनियम अंतर्गत असलेल्‍या अधिकारान्‍वये दिनांक १७ जूलै २०२० चे सायंकाळी ७.०० वा. पासून  दिनांक २० जूलै २०२० चे मध्‍यरात्री  ००.०० वा. पर्यंत संपूर्ण अकोला जिल्‍हयामध्‍ये लॉकडाऊन जाहीर करण्‍यात येत असून मुक्‍त संचार करण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे.

लॉकडाऊनचे कालावधीमध्‍ये खालील अत्‍यावश्‍यक बाबी व सेवा मर्यादित स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.

1)     दूध विक्री व  दुधाचे घरपोच वितरण सकाळी ६ ते ९  व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत अनुज्ञेय राहील.

2)     सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा  त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

3)     सर्व रुग्णालये व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा, आस्‍थापना त्‍यांचे  नियमित वेळेनुसार सुरु राहतील.  व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधित सेवा संस्था कारवाईस पात्र राहील.

4)   सर्व औषधांची दुकाने तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपूर्ण कालावधी करता सुरु राहतील.

5)    पेट्रोल पंप मे. वजीफदार अॅन्‍ड सन्‍स वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कंपनी, आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळील, मे. न्‍यु अलंकार सर्वो  पेट्रोलपंप, वाशिम बायपास, अकोला हे  सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत सुरू राहतील व ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनास इंधन पुरवठा साखळीतल वाहनास इंधन पुरवठा करतील.

6)     प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये एक पेट्रोल पंप सुरु  राहील या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करावे.

7)    राष्‍ट्रीय व राज्‍य महामार्गावरील पेट्रोलपंप सुरु राहतील.

8)    वर्तमानपत्राचे वितरण सकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील.

वरील बाबी वगळून इतर सर्व सेवा, आस्‍थापना, प्रतिष्‍ठाने, दुकाने, राष्‍ट्रीयकृत व खाजगी बॅंक तसेच वित्‍तीय संस्‍था, उद्योग व इतर सर्व व्‍यवसायपूर्णतः बंद राहतील.

याशिवाय कोविड-१९ च्‍या अनुषंगाने आवश्‍यक निर्देश

A.    जिल्‍हयातील सातही तालुक्‍यांच्‍या राष्‍ट्रीय महामार्ग, राज्‍य मार्ग, जिल्‍हा मार्ग व इतर अंतर्गत मार्ग इत्‍यादी रस्‍त्‍याच्‍या तालुकानिहाय सीमा बंद करण्‍यात येत आहेत.

B.     अत्‍यावश्‍यक सेवे व्‍यतिरिक्‍त कोणतीही व्‍यक्‍ती एका तालुक्‍यातून दुस-या तालुक्‍यात अथवा गावात प्रवेश करणार नाही.

C.     तालुकयाच्‍या सिमेवर पोलीस विभागाकडून चेकपोस्‍ट तैनात करुन नगरपालिका तसेच इतर यंत्रणेच्‍या माध्‍यमातून नियंत्रण ठेवण्‍यात यावे.

D.    विनापरवानगीने कोणत्‍याही मार्गाने सिमेच्‍या आत किंवा बाहेर जाणा-या व्‍यक्‍तींवर कायदेशिर कारवाई करण्‍यात यावे.

E. सार्वजनिक/खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे संपूर्णता बंद राहतील. तसेच मॉर्निंग Morning Walk  व  Evening Walk प्रतिबंधीत राहतील.

F.      अकोट, मुर्तिजापुर, बाळापुर, पातूर व बार्शिटाकळी या शहरामध्‍ये तसेच ग्रामीण भागामध्‍ये  कोविड-१९ च्‍या प्रादुभार्वामुळे बाधित रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. या करिता आवश्‍यकता असल्‍यास नगरपरिषद क्षेत्रामध्‍ये  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याचे दृष्‍टीने दिनांक  २० जूलै २०२० नंतर संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रामध्‍ये आवश्‍यकतेनुसार लॉकडाऊन बाबतचे  स्‍वतंत्र आदेश निर्गमित करण्‍याकरिता प्राधिकृत करण्‍यात येत आहे.

या  आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध कोणतीही व्यक्ती संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कायदेशिर कारवाई करण्‍याशिवाय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम – २००५ यामधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्‍यास पात्र असतील.

या बाबत संबंधित व्यक्ती, आस्थापना मालक/चालक, आयोजक, व्यवस्थापक कार्यालये इत्यादी यांना प्रत्येकास स्वतंत्र नोटीस देणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून सदरचे आदेश एकतर्फी करण्यात आलेले आहे. या आदेशाद्वारे विहीत करण्‍यात आलेल्‍या कोणत्‍याही निर्बधांची किंवा, काढलेल्‍या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्‍याही व्‍यक्‍तीने, भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) याच्‍या कलम १८८ अन्‍वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानन्‍यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या