49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान  49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या(इफ्फी) आयोजित केला जाणार आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक व महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी काल पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इफ्फी संदर्भात माहिती दिली.

महोत्सवाची सुरुवात ‘द आस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाच्या जागतिक प्रिमियरने होणार आहे.अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या इफ्फीची जय्यत तयारी सुरु असून राजधानी पणजी मध्ये सजावटीची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत. यंदाच्या चित्रपट महोत्सवात 68 देशातील 212 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटातून विविधतेचे दर्शन घडविले जाणार आहे. तसेच यंदाचा कंट्री फोकस हा इस्त्रायलवर असेल तर स्टेट फोकस झारखंडवर असणार आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार इस्त्रायलचे डॅन वॉलमन यांना देण्यात येणार आहे. एस्पर्न पेपर्सच्या प्रिमीयरवेळी चित्रपटाचे अभिनेते जोनाथन हेय मेयर्स, अभिनेत्री गोल्डन ग्लोब विजेत्या ज्योईली रिचर्डसन, अभिनेत्री मॉर्गन पोलान्सकी, निकोलस हॉव, ज्युलियन लॅडीएस उपस्थित राहणार आहेत.

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांचा समावेश आहे. त्यात तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. स्पर्धा विभाग 22 देशांनी निर्मित आणि साहाय्य निर्मित केलेले चित्रपट पहायला मिळणार आहेत.

‘फेस्टीव्हल केलिडोस्कोप’ विभागात विचारवंतांनी गौरवलेले 20 आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. जागतिक पॅनोरमा विभागात 67 चित्रपट असून हे चित्रपट यंदाच्या महोत्सवासाठी निवडण्यात आले आहेत. या विभागात 4 जागतिक प्रिमियर, 2 आंतरराष्ट्रीय प्रिमियर, 15 आशिया प्रीमीयर आणि 60 भारतीय प्रिमियरचा समावेश आहे. यंदा या विभागात 15 असे चित्रपट आहेत जे ऑस्करपुरस्कारासाठी पोहचले होते.

यंदाच्या महोत्सवात इंगमर बर्जमॅनवर रेट्रोस्पेक्टीव्ह विभाग असून यंदा बर्जमन यांची शंभरावी जयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त त्यांचे 7 चित्रपट या विभागातून दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय मेरी नायरेरोड यांनी दिग्दर्शित केलेला ‘बर्जमन आयलँड’या लघुपटाचा यात समावेश आहे. रेट्रोस्पेक्टीव्ह विभागाचे उद्घाटन दि. 21 रोजी ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’ या चित्रपटाने होणार आहे.

यावर्षी 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमामध्ये 22 फिचर फिल्म तर 4 मेनस्ट्रीम चित्रपट आणि 21 नॉन फिचर फिल्म दाखविण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरामामध्ये फिचर फिल्मचा शुभारंभ शाजी करुण दिग्दर्शित ‘ओलु’ याने होणार आहे.

यंदा युनेस्को गांधी मेडलसाठी दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मास्टरक्लास आणि इन कर्न्व्हसेशन विभागात प्रसून जोशी, डॅन वोल्मन, श्रीकर प्रसाद, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, वरूण धवन, गौरी शिंदे, आदी प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत.