
>> अक्षय शेलार
‘द ग्रॅज्युएट’ ही अस्वस्थतेची व दोन पिढय़ांमधील दरीची कथा न्यू हॉलीवूडच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या एका संपूर्ण पिढीचं प्रतिमान ठरणारी आहे.
1967 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द ग्रॅज्युएट’ हा चित्रपट न्यू हॉलीवूडच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या एका संपूर्ण पिढीचं प्रतिमान ठरला. माईक निकोल्स दिग्दर्शित या सिनेमातल्या तरुण बेंजामिन ब्रॅडक या पात्रामध्ये अमेरिकन समाजाच्या बदलत्या वास्तवाचं, गोंधळलेल्या मध्यमवर्गीय मूल्यांचं आणि तरुणाईच्या बेचैन अस्वस्थतेचं प्रत्यंतर चपखलरीत्या येतं. क्लासिक हॉलीवूडच्या परंपरेतून आलेल्या सुरक्षित, नैतिक आणि साचेबद्ध कथांच्या तुलनेत ‘द ग्रॅज्युएट’ ही अस्वस्थतेची व दोन पिढय़ांमधील दरीची कथा होती.
चित्रपटाने निर्माण केलेली दृष्टी आणि चित्रपटीय भाषेतील नवी शैली इथे महत्त्वाची आहे. छायाचित्रणातला क्लोज-अपचा वापर, प्रदीर्घ शांतता आणि पात्राच्या मानसिक गोंधळाला दृश्य-रचनेतून दिलेला आकार हे घटक सर्व क्लासिक हॉलीवूडमध्ये क्वचितच दिसणारे घटक होते. सायमन आणि गार्फंकेलची गाणी, विशेषत ‘द साऊंड ऑफ सायलन्स’ आणि ‘मिसेस रॉबिन्सन’ ही पारंपरिक पार्श्वसंगीतासारखी न वापरता पात्राच्या अंतर्मनाचा प्रतिध्वनी बनली व अशा प्रकारे संगीत हे कथनशैलीचं अविभाज्य अंग ठरलं.
बेंजामिन (डस्टिन हॉफमन) आणि मिसेस रॉबिन्सन (अॅन बॅनक्रॉफ्ट) यांचं नातं हे कथेचा केवळ केंद्रबिंदू नसून त्या काळच्या सामाजिक पोकळीचं प्रतीक आहे. युद्धानंतरच्या समृद्ध अमेरिकेत उभी राहिलेली मध्यमवर्गीय कुटुंबं आर्थिक यश नि स्थिरता असूनही भावनिक शून्यतेत जगत होती. मिसेस रॉबिन्सनची निराशा आणि बेंजामिनचा गोंधळ दाखवतात की, दोन पिढय़ा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्या अपूर्णतेत एकच रिक्तता दडलेली आहे. ‘द ग्रॅज्युएट’ने न्यू हालीवूडच्या अनेक वैशिष्टय़ांना स्पष्टपणे मूर्त रूप दिलं. पहिलं म्हणजे नायकाची रचना. बेंजामिन हा कोणत्याही अर्थाने त्याआधीच्या क्लासिक सिनेमांसारखा ‘नायक’ नाही. तो गोंधळलेला, निक्रिय आणि स्वतच्या आयुष्याच्या उद्देशाबद्दल अनभिज्ञ आहे. हाच ‘अँटी-हिरो’ न्यू हॉलीवूडमध्ये वारंवार दिसू लागतो. जसे की, ‘टॅक्सी ड्रायव्हर’मधला ट्रव्हिस बिकल किंवा ‘फाईव्ह ईझी पीसेस’मधला बॉबी डुपिया. दुसरं म्हणजे कथानकाची दिशा. बेंजामिन आणि एलेनचे शेवटी पळून जाणे जरी रोमँटिक वाटत असले तरी त्यानंतर बसमधल्या त्यांच्या चेहऱयांवर उमटणारी अनिश्चितता हे पारंपरिक सुखांताला उघड आव्हान आहे.
या चित्रपटाने निर्मितीच्या पद्धतीतही बदल घडवून आणले. हॉलीवूड स्टुडिओंच्या नेहमीच्या ‘स्टार पॉवर’वर विसंबण्याऐवजी डस्टिन हॉफमनसारखा अपरिचित, पारंपरिक देखणेपणापेक्षा व्यक्तिमत्त्वामुळे वेगळा ठरणारा अभिनेता मुख्य भूमिकेत आणणं, हा मोठा बदल होता. यामुळे हॉलीवूडच्या सौंदर्यशास्त्रातल्या प्रस्थापित चौकटी मोडण्यास सुरुवात झाली. मात्र स्त्राr पात्रांच्या बाबतीत चित्रपटाची दृष्टी मर्यादित भासते. मिसेस रॉबिन्सनची व्यक्तिरेखा ही अमेरिकन समाजातील एका पिढीच्या निराशेचं प्रतीक जरी असली तरी तिचं स्वतंत्र अस्तित्व पूर्णपणे उलगडत नाही. एलेनचे पात्र तर आणखी सपाट आणि आदर्शीकृत आहे. तरीही काही मर्यादांसह ‘द ग्रॅज्युएट’ने अमेरिकन सिनेमाच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू केलं. त्याने दाखवून दिलं की, तरुण प्रेक्षकांना त्यांच्या गोंधळाचा, अस्वस्थतेचा आणि बंडखोरीचा आरसा हवा आहे. त्यासाठी पारंपरिक कथानक, स्टार्स किंवा साचेबद्ध संवाद नव्हे, तर धाडसी शैली, वेगळं संगीत आणि अस्पष्ट ‘ओपन एंडिंग’ आवश्यक आहे. शेवटच्या बस प्रवासात बेंजामिन आणि एलेनच्या चेहऱयांवर उमटलेला गोंधळ, त्यातला धूसर आनंद आणि त्याचबरोबर येणारी भविष्याची भीती हा फक्त त्यांच्या नात्याचा नाही, तर संपूर्ण अमेरिकन पिढीचा चेहरा ठरतो आणि याच कारणाने ‘द ग्रॅज्युएट’ला न्यू हॉलीवूडच्या सुरुवातीची खरी घोषणा म्हणता येईल. ‘द ग्रॅज्युएट’च्या यशामध्ये त्याच्या दिग्दर्शक माईक निकोल्सचा दृष्टिकोन निर्णायक ठरला. निकोल्सनं रंगमंचावरून चित्रपटात प्रवेश केला होता आणि त्याची मंचावरील संवेदनशीलता पडद्यावर अनोख्या प्रकारे दिसून आली. कॅमेराच्या हालचालीतून, दृष्टिकोनांच्या खेळातून त्याने बेंजामिनच्या अंतर्मनाला स्वरूप दिलं. उदाहरणार्थ, स्वीमिंग पूलमध्ये बेंजामिन एकटा तरंगताना दिसतो तो प्रसंग त्याच्या आयुष्याच्या दिशाहीनतेचं रूपक आहे. ही दृश्यं पारंपरिक हॉलीवूडमध्ये ‘फिलर’ मानली गेली असती, पण इथे ती कथानकाच्या गाभ्याशी निगडित आहेत.
चित्रपटाच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त सिनेमॅटिक प्रयोगापुरता मर्यादित नाही. 1960 च्या दशकात अमेरिकन समाज युद्ध, नागरी हक्कांचं आंदोलन आणि लैंगिक स्वातंत्र्याच्या प्रश्नांमुळे हलत होता. ‘द ग्रॅज्युएट’ या सर्व बदलांना थेट स्पर्श करत नाही, पण त्यांचा अंतस्तर संपूर्ण कथानकभर जाणवत राहतो. तरुणाईची बेचैनी ही केवळ वैयक्तिक नाही, तर ती सामाजिक पातळीवरची आहे आणि निकोल्सनं ती दृश्यभाषेत पकडली. तरीही या चित्रपटाचं स्थान केवळ तेवढय़ा कालखंडात मर्यादित राहत नाही. पुढच्या दशकात आलेल्या असंख्य सिनेमांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो. वुडी अॅलनच्या ‘अॅनी हॉल’मधल्या अंतर्मुख नायकापासून ते सोफिया कोपोला किंवा रिचर्ड लिंकलेटरसारख्या नंतरच्या पिढय़ांपर्यंत ‘द ग्रॅज्युएट’नं दिलेला गोंधळलेला, पण प्रामाणिक ‘आवाज’ ही एक परंपरा बनली.
महत्त्वाचं म्हणजे ‘द ग्रॅज्युएट’ने प्रेक्षक आणि सिनेमाच्या नात्यालाही बदललं. याआधी हॉलीवूडनं प्रेक्षकाला स्वप्नं विकली होती, ती म्हणजे एक परिपूर्ण कथा, परिपूर्ण प्रेम, परिपूर्ण शेवट, पण इथे प्रेक्षकाला स्वतच्या जीवनातील अपूर्णतेचा आरसा दाखवला गेला. त्यामुळे प्रेक्षक केवळ मनोरंजनाचा उपभोक्ता न राहता स्वतच्या गोंधळाचा साक्षीदार बनला आणि म्हणूनच ‘द ग्रॅज्युएट’ ही केवळ एका तरुणाच्या प्रौढ होण्याची कथा नाही, ती एका देशाच्या, एका संस्कृतीच्या प्रौढ होण्याच्या प्रक्रियेचं रूपक आहे. त्यातली बेचैनी, रिक्तता आणि अपूर्णता ही केवळ साठ-सत्तरच्या दशकापुरती मर्यादित नाही. आजही नव्या पिढय़ांमध्ये तीच अनिश्चितता, तीच स्वतला शोधण्याची धडपड जाणवते. त्यामुळे हा चित्रपट काळाच्या पलीकडे जाऊन प्रभावी ठरतो.




























































