
>> अक्षय शेलार
समाजातील ढोंग, राजकारणातील विसंगती आणि मानवी वर्तनातील विरोधाभासांवर उपहासात्मक मांडणी करणारा एक चिंतनशील कलाकार जिम जेफ्रीज. त्याची कॉमेडी म्हणजे एकाच वेळी उग्र, थेट आणि बिनधास्त भाष्य करणारी शैली ठरते.
स्टँडअप कॉमेडीच्या जगतात ज्या कलाकारांनी स्वतचं ठळक स्थान निर्माण केलं त्यात जिम जेफ्रीज हा एक महत्त्वाचा आवाज मानला जातो. मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला जेफ्रीज आज ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रेक्षकांमध्ये तेवढय़ाच उत्साहाने ऐकला जातो. त्याची कॉमेडी म्हणजे एकाच वेळी उग्र, थेट आणि बिनधास्त भाष्य करणारी शैली. राजकारण, धर्म, समाज व्यवस्था आणि लैंगिकता यांसारख्या विषयांवर तो इतक्या निर्भीडपणे विनोद करतो की, काही वेळा प्रेक्षकांना धक्का बसतो, पण त्याच धक्क्यामुळे त्याचा प्रभाव वाढतो.
जेफ्रीजच्या विनोदाची सर्वात ठळक ओळख म्हणजे त्याचे गन कंट्रोलवरचे भाष्य. ‘बेयर’ (2014) या नेटफ्लिक्स स्पेशलमधील त्याचा लांबलचक बिट अमेरिकेतील शस्त्र बाळगण्याच्या संस्कृतीवर केलेली थेट टीका म्हणून प्रसिद्ध आहे. या बिटमध्ये तो अमेरिकन प्रेक्षकांसमोरच त्यांची शस्त्रधारणा करण्याची हौस उघडपणे चेष्टेत घेतो. `We don`t have guns in Australia, and guess what, fewer people get shot!` अशा वाक्यातून तो एक गंभीर सामाजिक वास्तव अधोरेखित करतो. स्टँडअपच्या इतिहासात क्वचितच जे कॉमेडियन आपल्या कामगिरीने सार्वजनिक चर्चेला इतका आकार देतात, त्यापैकी हा एक. त्याच्या कामाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे धर्मावरचे भाष्य. जेफ्रीजने ‘आय स्वेअर टू गॉड’ (2009) या स्पेशलपासूनच ख्रिश्चन धर्म आणि त्यातील विसंगतींवर उघडपणे विनोद केले. त्याच्या या शैलीमुळे तो नास्तिकतेचा एक प्रकारचा प्रतिनिधी वाटतो. अनेकदा तो स्वतला ‘नॉन-बिलिव्हर’ म्हणून सादर करतो आणि धार्मिक रूढींमधली ढोंग आणि दांभिकता उघडकीस आणतो.
जेफ्रीजची सादरीकरणाची शैलीदेखील विशेष आहे. तो लांबच लांब कथा सांगतो, त्यात शिव्यांचा उघडपणे वापर करतो, पण त्याच वेळी कथनात असा लयबद्ध उतार-चढाव ठेवतो की, पंचलाइनचा परिणाम दुप्पट होतो. त्याच्या कथनात एक प्रकारचा सुस्तावलेला ऑस्ट्रेलियन टोन आहे, ज्यामुळे त्याची थेट आणि कडवट निरीक्षणंही सहज वाटतात.
त्याच्या कॉमेडीत नेहमीच ‘पॉलिटिकल इनकरेक्टनेस’ असते. महिलांवरील विनोद, लैंगिकता, अपंगत्व, मानसिक आजार यांसारख्या विषयांवर तो फारच तिरसट पद्धतीने बोलतो. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकादेखील झाली आहे. मात्र जेफ्रीज या वादांना घाबरत नाही. उलट त्यांना तोच स्वतच्या विनोदाचा एक भाग बनवतो. “If you are offended, then maybe comedy is not for you,“ अशा थाटात तो प्रेक्षकांना चिडवतो. मात्र या सगळ्या वादांपलीकडे त्याची कॉमेडी एक गोष्ट स्पष्ट करते ः तो प्रामाणिक आहे. आपल्याला जे वाटतं ते तो सांगतो आणि त्यामुळे प्रेक्षक त्याच्या मताशी सहमत असो वा नसो, त्याच्या शैलीचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.
त्याचा प्रवासही लक्षात घेण्यासारखा आहे. ऑस्ट्रेलियाहून ब्रिटन आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेला जेफ्रीज नेहमीच बाहेरून अमेरिकेकडे पाहतो. त्यामुळे त्याच्या विनोदात एक तिऱहाईताचा दृष्टिकोन असतो. अमेरिकन संस्कृती, बंदुकींचं वेड, धार्मिक श्रद्धा याकडे तो एका बाहेरच्या नजरेतून पाहतो आणि त्यावर त्याची टिपणी अधिक टोचून बोलते. त्याची शैली कडवट आहे, पण ती एकाच वेळी खऱया जगाशी भिडणारी आहे.
जेफ्रीज स्वतच्या आयुष्याबद्दल उघडपणे बोलतो. आपल्या मद्यपानाच्या सवयी, वैयक्तिक नातेसंबंध, वडील होण्याचा अनुभव इ. या सगळ्यांतून त्याची स्टेजवरची प्रतिमा केवळ वादग्रस्त कॉमेडियन म्हणून नाही, तर स्वतच्या दोषांवर विनोद करू शकणारा एक प्रामाणिक माणूस म्हणूनही उभी राहते.
जिम जेफ्रीजच्या स्टँडअपकडे बारकाईने पाहिलं तर लगेच लक्षात येतं की, त्याची ताकद ही फक्त गचाळ विनोदांमध्ये किंवा टॅबूजमध्ये नाही, तर त्यामागच्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक निरीक्षणांमध्ये आहे. तो स्वतला एक प्रकारचा ‘अनफिल्टर्ड कॉमेंटेटर’ म्हणून सादर करतो. असा निरीक्षक, जो जगाकडे एकदम स्पष्ट, थेट नजरेने बघतो. त्याच्या कथांमागे एक सखोल सामाजिक भान असते. त्याचं सर्वात चर्चेत राहिलेलं काम म्हणजे अमेरिकेतील गन कंट्रोलवर आधारित रूटिन. अर्ध्या तासाचा हा सेगमेंट आजही चर्चेत आहे. या सेगमेंटमध्ये तो अमेरिकन लोकांच्या बंदुकांबद्दलच्या हट्टी भूमिकेवर उपहास करतो. थेट, बेधडक मांडणी, पण त्याच वेळी अप्रतिम विनोदबुद्धी आणि टायमिंगसह केलेले सादरीकरण ही त्याच्या स्टँडअपची ओळख बनली. जिम जेफ्रीजने आपल्या स्टँडअपमधून केवळ मनोरंजन करत नाही, तर तो समाजातील ढोंग, राजकारणातील विसंगती आणि मानवी वर्तनातील विरोधाभासांवर थेट प्रकाश टाकतो. म्हणूनच तो फक्त कॉमेडियन नाही, तर उपहासात्मक मांडणी करणारा एक चिंतनशील कलाकार ठरतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)


























































