
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता एक नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आता बायोपिक येऊ घातला असून अक्षय त्यात मुख्य भूमिका करत असल्याची चर्चा आहे.
मुंबई मिररने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. स्पेशल 26, बेबी, रुस्तम, टॉयलेट एक प्रेमकथा अशा चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत काम करणारा दिग्दर्शक नीरज पांडे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पण, या चित्रपटाचं चित्रीकरण कधी सुरू होईल, त्याबद्दल निश्चित सांगण्यात आलेलं नाही. कारण नीरज सध्या अजय देवगणच्या आगामी चाणक्य या चित्रपटात व्यग्र आहे, तर अक्षयचे सध्या इतर काही प्रोजेक्ट्स सुरू आहेत. त्यामुळे काही महिन्यांनंतरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
उरी या चित्रपटात अजित डोवाल यांच्या भूमिकेत अभिनेते परेश रावल झळकले होते. त्यानंतर आता अक्षय या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या भूमिकेविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

























































