
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिवशी साक्षात श्री विठ्ठल भगवान त्यांना भेटायला गेले होते. अशी आख्यायिका आहे. त्यामुळे प्रतिवर्षी या सोहळ्यासाठी पंढरपुरातील विठोबाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत निघतात. यंदा कोरोनाच्या सावटामुळे विठ्ठलाच्या पादुका यंदा एसटीने प्रवास करीत आळंदीस निघाल्या आहेत.
प्रतिवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान ठेवत असत. यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला निघाल्या. साधारण पाच महिन्यापूर्वी झालेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी यंदा कोरोनामुळे सर्व संत एसटीने पंढरपूरला आले होते. त्यानंतर आता विठ्ठलालाच एसटीने माऊलीच्या भेटीसाठी आळंदीला जावे लागले आहे.
शुक्रवारी सकाळी विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला निघाल्या. या पादुका दुपारी दोन वाजेपर्यंत आळंदी येथे पोहोचतील. त्यानंतर पुढे दोन दिवसाचा आळंदी येथे पादुकांचा मुक्काम असणार आहे. त्रयोदशीला अर्थात 13 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिवशी विठ्ठलाची आणि माऊलीची भेट होईल. त्यानंतर या पादुका परत एसटीनेच पंढरपूरला परततील.
विठ्ठलाच्या पादुकांसमवेत एसटीने मंदिर समितीचे सदस्य नित्योपचार विभागातील पुजारी आणि सुरक्षारक्षक असे 20 लोक आळंदीकडे रवाना झाले आहेत. या सर्व व्यक्तींच्या कोरोना तपासण्या करून त्यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिलीय.


























































