
अल्बेनिया देशाने काही दिवसांपूर्वी सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) मंत्र्यांची नियुक्ती केली होती. आता या एआय मंत्री गर्भवती असल्याची माहिती अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी दिली आहे. एआय मंत्री डिएला लवकरच 83 एआय मुलांना जन्म देणार असल्याचे एडी रामा यांनी सांगितले. ही 83 मुले संसदेतील समाजवादी पक्षाच्या प्रत्येक सदस्याचे सहकारी म्हणून काम करतील.
बर्लिन येथे ग्लोबल डायलॉग (बीजीडी) मध्ये बोलत असताना एडी रामा म्हणाले, आज आम्ही डिएलाबरोबर मोठा धोका पत्करला आहे. डिएला पहिल्यांदाच गर्भवती राहिली असून ती 83 मुलांना जन्म देणार आहे. एआय मुलांचे काम काय असणार? याचीही माहिती पंतप्रधान एडी रामा यांनी दिली. ते म्हणाले, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याबरोबर हे एआय सहाय्यक म्हणून कामात मदत करतील. ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतील आणि संसदेच्या सदस्यांना तशी माहिती अवगत करून देतील. या मुलांकडे आईप्रमाणेच ज्ञान असेल.


























































