
राज्यात कोरोनाच्या विषाणूचे बदललेले घातक रूप समोर आले असून या डेल्टा प्लस विषाणूमुळे तिसऱया लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. अधिक वेगाने संसर्ग होणाऱया या विषाणूचा धोका टाळण्यासाठी आज राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासाठी ठरविण्यात आलेला पहिला व दुसरा स्तर रद्द करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सर्व जिह्यांत तिसऱया स्तराचेच निर्बंध कायम राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच घेतलेल्या सात जिह्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांना निर्बंध शिथिल करण्याची घाई करू नका, असे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचनांनुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचे प्रमाण कितीही कमी असले, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱया गटाच्या वरच असणार आहेत.
डेल्टा प्लस किती घातक?
जिनोम सिक्वेन्सिंग लॅबने काढलेल्या निष्कर्षांनुसार डेल्टा प्लस हा विषाणू शरीराला घातक आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने म्हणजे 60 टक्क्यांपेक्षाही अधिक वेगाने पसरतो. फुफ्फुसांच्या पेशींना घट्ट चिकटण्याची क्षमता यामध्ये आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती अधिक वेगाने कमी होत असून ऑण्टिबॉडीजची संख्याही घटत असल्याचे दिसून आले आहे. सध्या हा विषाणू रत्नागिरी, जळगाव तसेच अन्य काही जिह्यांत सापडल्याने कठोर निर्बंध लावण्याची गरज मुख्य सचिवांनी वर्तवली आहे.
काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी तिसऱया स्तरावरील बंधनांसह त्याहून उच्च दर्जाची बंधने किंवा अधिक बंधने लागू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील.
- जेव्हा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असेल तर सध्या स्थानिक प्रशासनाने अधिक कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.
- कोरोनाच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करा.
- सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठय़ा प्रमाणावर कराव्यात.
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करावी.
- कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोटय़ा क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.
- विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत.
- साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारावरच निश्चित करण्यात यावा. यासाठीची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
- गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.
- सर्व शहरे आणि जिह्यांत साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट, ऑक्सिजन खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी निर्बंध तिसऱया स्तराइतका ठेवावा.
- कोरोनाचा प्रसार रोखून बंधने शिथिल करताना लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करावे.
- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टेस्ट–ट्रक–ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.
डेल्टा आणि आता डेल्टा प्लस या नवीन अधिक घातक विषाणूचा फैलाव होऊ लागला आहे. यामुळे येत्या चार ते सहा आठवडय़ांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची शक्यता मुख्य सचिवांनी व्यक्त केली.
50 लाख संक्रमित होतील!
राज्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेत 50 लाख लोक संक्रमित होण्याचा धोका आहे. लहान मुलेदेखील प्रभावित होण्याची शक्यता असून जवळपास 5 लाख बाधित होतील, असा अंदाज असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
काय म्हणाले शिंगणे…
- या लाटेत जवळपास 50 लाख लोक संक्रमित होतील, तर साधारण 8 लाख ऑक्टिव रुग्ण राहतील असा अंदाज आहे.
- या लाटेत लहान मुलेदेखील संक्रमित होण्याची चर्चा आहे. यातील 2.5 टक्के बालके शासकीय रुग्णालयात दाखल होतील, तर 3.5 टक्के बालकांना बालरोग तज्ञांकडून उपचार करण्याची गरज पडेल.
- दुसऱया लाटेत रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासंदर्भात काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या. यावेळी आरोग्य सुविधांत कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
































































