‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा निवृत्त, उर्वरित आयुष्यात शिक्षण, समाजसेवेसाठी वाहून घेणार

617

जगातील 500 धनाढ्यांच्या यादीत 20 व्या स्थानावर असलेले चीनच्या अलिबाबा समूहाचे सर्वेसर्वा जॅक मा मंगळवारी 55 व्या वाढदिनी निवृत्त झाले. त्यांनी वर्षभरापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ते शिक्षण आणि समाजसेवेसाठी वाहून घेणार आहेत. मंगळवारी त्यांनी स्वतःकडील अध्यक्षपदाचा कार्यभार सीईओ डॅनियल झाँग यांच्याकडे सोपवला.

चीनबरोबरच जगभरातील मार्केटमध्ये दबदबा राहिलेल्या अलिबाबा समूहाची 1999 साली जॅक मा त्यांच्या मित्रमंडळींनी स्थापना केली. केवळ तीन वर्षांतच कंपनीची भरभराट सुरू झाली. सध्याच्या घडीला या कंपनीची उलाढाल तब्बल तीन लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यास जॅक मा यशस्वी झाले. उद्योगक्षेत्रातील त्यांच्या या प्रगतीमुळे ते चीनमधील उद्योजकांचे आदर्शस्थान बनले आहेत. व्यवसायात पाय ठेवण्याआधी ते इंग्रजीचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड तळमळ असून निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य शिक्षण आणि समाजसेवेसाठीच वाहून घेण्याचा निर्धार केला आहे. चीनमध्ये 10 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी वाढदिवसही असल्याने जॅक मा यांनी निवृत्तीसाठी हाचसुवर्णयोगनिवडला. ते पुढील वर्षभर कंपनीचे सल्लागार राहणार आहेत.

शिक्षण क्षेत्रासाठी 4.5 कोटी डॉलर देणार

शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदलाचा आग्रह धरणारे जॅक मा हे या क्षेत्रात भरीव योगदान देणार आहेत. त्यांच्या फाऊंडेशनने 2017 साली चीनच्या ग्रामीण भागात शिक्षक घडवण्यासाठी तब्बल 4.5 कोटी डॉलर इतक्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. या घोषणेला अनुसरून ते शिक्षणक्षेत्राला मदतीचा हात पुढे करणार आहेत.

सक्षम नेतृत्वशैली

जॅक मा यांनी उद्योग क्षेत्रातील दूरदृष्टीच्या जोरावर अलिबाबा समूहाला चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत 145 टक्के अधिक नफा मिळवून दिला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत उद्योग समूहाचा नफा 3.1 अब्ज डॉलरवर पोचला. कंपनीच्या या प्रगतीने मा यांच्या सक्षम नेतृत्वशैलीची प्रचीती आणून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या