जिल्ह्यात 22 लाख 1 हजार 326 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हयात 22 लाख 1 हजार 326 मतदार नोंदणी झालेली असून हे मतदार यावेळी लोकसभेला आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत 45 हजार 887 मतदारांची नोंद झालेली आहे. ही मतदार यादी जिल्ह्यातील 2693 मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 10 लाख 98 हजार 727 पुरुष मतदार, तर 10 लाख 55 हजार 641 महिला मतदार व 04 इतर मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यात मतदार नोंदणी जी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर करण्यात आली. त्यात नवीन नाव नोंदणी, नाव वगळणी, पत्ता बदल इ. करण्यात आले. त्यानंतर 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात 11 लाख 19 हजार 743 पुरुष मतदार, 10 लाख 80 हजार 513 महिला मतदार व अन्य 3 मतदार असे एकूण 22 लाख 259 मतदार नोंदविण्यात आले. तसेच 1057 सर्व्हिस मतदार व 10 एनआरआय मतदार यांचा समावेश करुन जिल्ह्यात एकूण 22 लाख 1 हजार 326 मतदार नोंदणी झाली आहे.

गेल्या वेळच्या यादी नुसार या कार्यक्रमानंतर जिल्ह्यात 21 हजार 16 पुरुष मतदार व 24 हजार 872 स्त्री मतदारांची वाढ झालेली असून 01 तृतीय पंथी मतदार यांची वगळणी झालेली आहे. अशी एकूण 45,887 मतदारांची वाढ झाली आहे.

या अंतिम मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात मतदार यादी फोटो असलेले एकूण 20 लाख 96 हजार 599 मतदार असून त्याची टक्केवारी 95.29% आहे. तसेच मतदार ओळखपत्र असलेले एकूण 21 लाख 13 हजार 623 मतदार असून त्याची टक्केवारी 96.06% आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण हे 1000 पुरुष मतदारांमागे 965 आहे.

निरंतर मतदार नोंदणी सुरू आहे. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. निवडणूक नामनिर्देशन दाखल होईपर्यंत ज्या ज्या मतदारांची नावे नोंदविली जातील त्यांची स्वतंत्र पुरवणी यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी व मतदार यादी अचूक व शुध्दीकरण करण्यासाठी आपले अनमोल सहकार्य करावे असे आवाहन, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.