
निसर्गरम्य अलिबाग ते मांडवा दरम्यानच्या समुद्रकिनाऱयावर बेकायदेशीरपणे बंगले बांधणाऱया 580 जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बडे उद्योजक, चित्रपट अभिनेते आणि मोठय़ा व्यापाऱयांचे धाबे दणाणले असून आपली बांधकामे वाचविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा कारवाईचा ‘हातोडा’ उगारला असून अलिबागचे निसर्गसौंदर्य नष्ट करू पाहणाऱयांविरोधात कंबर कसली आहे.
अलिबागच्या समुद्रकिनारी मुंबईतील मोठे उद्योजक, फिल्मस्टार, वकील, राजकीय हस्ती यांनी जागा घेऊन आलिशान बंगले बांधले आहेत. हे बंगले आणि फार्महाऊस सीआरझेड उल्लंघन करून आणि जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता बांधले आहेत. काहींनी बांधकाम परवानगीव्यतिरिक्त जादा अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 45 नुसार नोटिसा पाठविल्या आहेत.
सदरची अनधिकृत बांधकामे जिल्हा प्रशासनाकडून पुढील काळात पाडण्यात येणार की दंड वसूल करून अधिकृत केली जाणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र या नोटिसांमुळे बेकायदा बांधकामे करणाऱयांचे धाबे दणाणले आहे.
अधिकाऱ्याचे पथक
रेवदंडा ते मांडवा या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱयांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने मौजे अलिबाग ते मांडवा या ठिकाणी बांधकामाचे सर्वेक्षण करून तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.

























































