अलिबाग जिल्हा परिषदेत सात जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

1161

रायगड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण हे चांगले आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. रायगड जिल्हा परिषदेतही 231 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असून यामध्ये सात जणांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद कार्यालय हे निर्जंतुक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा बारा हजार पार झाला आहे. शासकीय कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, जिल्हा सामान्य रुग्णालय या कार्यालयात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयातही कोरोना लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

अलिबाग हे मुख्यालयाचे ठिकाण असून कामानिमित्त नागरिक हे शासकीय कार्यालयात येत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क येत असतो. जिल्हा परिषदेमध्येही नागरिक कामानिमित्त येत असल्याने कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यात आली. 231 जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली असून यामध्ये शिक्षण विभागातील 3, सामान्य प्रशासन 3 तर आरोग्य मधील 1 असे सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सात जणांवर कोरोनाबाबत उपचार सुरू आहेत. सात जण रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषद कार्यालय निर्जंतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या