
पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी पडत असलेला अवेळी पाऊस, क्यार चक्रीवादळ, महा चक्रीवादळ यामुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मच्छीमार बांधवाकडून शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
1 ऑगस्टपासून शासनाकडून समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात मच्छीमारीसाठी सोडल्या. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छी मोठ्या प्रमाणात मिळणे कठीण झाले आहे. त्यातच दोन आठवड्यापूर्वी झालेल्या क्यार चक्रीवादळाने मच्छीमार बोटी समुद्रकिनारी विसावल्या होत्या. याचा फटकाही कोळी बांधवाना पडला आहे.
6 ते 8 नोव्हेबर रोजी पुन्हा महा चक्रीवादळाची शक्यता वर्तवली असल्याने जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. वातावरण बदलाने समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमाराना मच्छी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना मच्छीमार बांधवही आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सध्या समुद्रात आठ ते दहा वार पर्यंत छोट्या मच्छीमार बोटी जात असून त्यांनाही कोलंबी, मांदेली यासारखी छोटी मच्छी मिळत आहे. त्यामुळे डिझेल खर्चही परवडत नाही. तर वादळ असल्याने मोठ्या मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर लागलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या बोटीवर असलेले खलाशी, कर्मचारी यांचा खर्च नाखवाच्या खिशातून जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे कोळी बांधव हा मेटाकुटीला आला आहे.
शेतकऱ्याच्या भातशेतीचे नुकसान झाले असताना शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र मच्छीमाराकडे अद्याप शासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमाराचाही मत्स्य दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी कोळी बांधवाकडून केली जात आहे.





























































