अलिबाग रोहा रस्त्यावर अपघात

4580

अलिबाग रोहा रस्त्यावर मल्याण फाट्यावर खड्ड्यात गाडी पलटल्याने अपघात झाला आहे. यात सात महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला, डोक्याला दुखापत झाली आहे. या सात जणी मध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. सर्व जखमींना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खड्ड्यात गाडी कोसळल्यामुळे हा अपघात झाला असून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, भारती गायकर, वंदना गायकर, जयश्री गायकर, शारदा गायकर, निकिता गायकर, सानिका गायकर,(गर्भवती) सुनंदा गायकर (सर्व राहणार मूळ खानाव ) अशी जखमींची नावे आहेत.

सानिका गायकर हिच्या वडिलांचे दहावे आंदोशी येथे आज होणार होते. त्यासाठी मूळ खानाव येथून (एमएच 06/ जे 683) या सिताराचे चालक नंदकुमार पाटील हे महिलांना घेऊन आंदोशीकडे निघाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मल्याण फाटा येथे आला असता खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ती खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात सात महिला जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच खानाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अलिबाग रोहा हा रस्ता खड्डेमय झाला असून अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याला पडलेले खड्डेही भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असतात. रोज होत असलेल्या अपघातामुळे प्रवासी जखमी होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या