अलिबागच्या नाट्यगृहात तिसरी घंटा आज वाजणार, आगीच्या भडक्यामुळे तीन वर्षांपासून होते बंद; नाट्यरसिकांना मिळणार मेजवानी

तीन वर्षांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाचा अखेर पडदा उघडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या एका दिमाखदार सोहळ्यात तिसरी घंटा वाजणार आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला असून अलि बागकरांना नवनवीन नाटके तसेच अन्य सांस्कृतिक उपक्रम पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. या नाट्यगृहाची 723 आसन क्षमता आहे.

सरकारी अनुदानातून सहकारी तत्त्वावर चालवण्यात येणारे राज्यातील पहिले नाट्यगृह 2017 मध्ये पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या माध्यमातून अलिबागकरांच्या चेंढरे येथे सुरू करण्यात आले होते. पाच वर्षे विविध संस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाट्यगृहाच्या माध्यमातून अलिबागकरांना अनुभवता आली. मात्र 15 जून 2022 रोजी नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि संपूर्ण नाट्यगृह खाक झाले. नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी पडून ही आग लागली होती. दुर्घटनेमुळे पीएनपी नाट्यगृह तीन वर्षे बंद होते. अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती. नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले आहे. 7 जुलै रोजी या नाट्यगृहाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएन पी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली.

स्थानिकांना दरामध्ये विशेष सवलत
आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर पुन्हा एकदा सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त असणारे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञान, जेबीएल साऊंड सिस्टीमचा वापर करून सुसज्ज असे 723 आसन व्यवस्था, मुबलक पार्किंग व्यवस्था असणारे नाट्यगृह रसिकांसाठी सज्ज झाले आहे. नाट्यगृहाचे दर अन्य नाट्यगृहांप्रमाणेच सर्वसामान्यांना परवडतील असे असणार आहेत. स्थानिकांना दरामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे.