अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने ‘भाव’ खाल्ला, दोनशे रूपयांपासून अडीचशेपर्यंत माळ

गेल्या तीन-चार महिन्यांपासून कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे वांदे झाले असतानाच आता औषधी समजला जाणारा अलिबागच्या पांढऱ्या कांद्यानेदेखील भाव खाल्ला आहे . या वर्षी लागवडीखालील क्षेत्र घटल्याने उत्पादन कमी झाले असून दिडशे रूपयांना मिळणारी चांगल्या प्रतीची माळ आता दोनशे ते अडीचशे रूपयांपर्यंत गेली आहे . त्यामुळे फोडणीच्या कांद्यापाठोपाठ हा गुणकारी कांदाही खवय्यांच्या ताटातून गायब झाला आहे .

अलिबाग-वडखळ रस्त्यावर पांढऱ्या कांद्याच्या माळी सजवून विक्रीस ठेवण्यात येतात . या वर्षी 223.05 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे . साधारण सात ते आठ टन उत्पादन या वर्षी आले आहे . मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ हेक्टर कांदा लागवड क्षेत्र कमी झाले असल्याने या कांद्याचे दर वाढले आहे .

खंडाळा , कार्ले , नेहुली , सागाव , वाडगाव या भागात पांढऱ्या कांद्याचे सर्वाधिक पीक घेतले जाते . भातकापणीनतंर शेतजमीन सुकली की कांद्याची बी पेरली जाते . फेब्रुवारी, मार्च महिन्यात पांढरा कांदा काढणीस तयार होतो . कांदा शेतातून काढून तो साचा लावून सुकवतात. अलिगाब तालुक्यात 223 हेक्टर जमिनीवर सात ते आठ टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे . 2019 मध्ये 250 तर गेल्या वर्षी 232 हेक्टर जमिनीवर पांढरा कांद्याची लागवड केली आहे . मात्र तीन वर्षांपासून लागवडीचे क्षेत्र हे कमी होत चालले आहे .

स्वतःची ओळख मिळणार

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता कोरोना असला तरी संचारबंदी नाही . त्यामुळे रायगडमध्ये येणारे पर्यटक-चाकरमानी आवर्जून हे कांदे घेत आहेत . दरम्यान , या औषधी कांद्याला आपली ओळख मिळावी म्हणून कृषी विभागाने मानांकन मिळावे याकरीता प्रयत्न सुरू केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या