
सामना प्रतिनिधी। अलिबाग
आगामी लोकसभेची रंगीत तालीम म्हणून लक्ष लागून राहिलेल्या रायगड जिल्हय़ातील 79 सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य पदासाठी उद्या 24 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून 300 मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क साडेसात ते साडेपाच यादरम्यान बजावणार आहेत. दरम्यान मतदान सुरळीत पार पडावे यासाठी 1 हजार आठशे शासकीय व पोलीस कर्मचारी मतदान केंद्रांवर आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. 79 सरपंचपदासाठी 226 उमेदवार रिंगणात आहेत तर 689 सदस्यपदासाठी 1 हजार 631 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाल्यानंतर लागेच दुसऱया दिवशी म्हणजे सोमवारी 25 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विजयाच्या माळा कुणाच्या गळय़ात पडणार व सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.
मतदान ते मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणूक पार पडणार आहे त्या ठिकाणी विभागातून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





























































