
लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड फेकल्याच्या घटना अनेकवेळा समोर येतात. पण अलिगढ य़ेथे प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असून आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. फैजान असे तरुणाचे नाव आहे.
अलिगढमधील जीवनगढ गली क्रमांक एक मध्ये राहणाऱ्या फैजानचे वस्तीतील एका तरुणीवर प्रेम होते. तो कपड्याच्या दुकानात काम करत होता. फैजान व तरुणीला निकाह करायचा होता. पण फैजलच्या आईचा यास विरोध होता. यामुळे फैजलने आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आई व कुटुंबातील इतर जण आपल्या मतावर ठाम होते. यामुळे फैजलने तरुणीबरोबरचे प्रेमसंबंध तोडले. त्याने तिच्याशी बोलणे बंद केला. तरुणी त्याला वारंवार फोन करत होती. पण फैजलने तिला फोन करुन त्रास देऊ नकोस असे बजावले. यामुळे चिडलेल्या तरुणीने त्याला बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन दिवस तरुणीने फैजलशी संपर्क केला नाही. यामुळे तरुणी घाबरली असे समजून फैजल निश्चिंत झाला.
पण गुरुवारी संध्याकाळी फैजल मित्राबरोबर एका दुकानाबाहेर बसलेला असताना अचानक तरुणी तिथे आली. फैजलला बघताच तिने त्याच्या चेहऱ्यावर सोबत आणलेले अॅसिड फेकले. यात फैजल गंभीर जखमी झाला आहे. यावेळी फैजलच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या मित्राच्या पायावरही अॅसिड पडल्याने तोही जखमी झाला आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तरुणीला अटक करण्यात आली आहे.
























































